तब्बल साडे नऊ लाखाची खोटी सोन्याची नाणी देऊन मित्रानेच फसवले; गुन्हा दाखल…

0

 

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

फसवणुकीची एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या जवळील वडीलोपार्जित सोन्याची नाणी विकायची आहे, असे सांगून नागपूर येथील दोन जणांची तब्बल साडे नऊ लाखांत फसवणूक केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी मुक्ताईनगर पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर शहरातील वर्धारोड अपना भंडारजवळ दिनेश दत्तूजी भोंगाडे (३४) हे आई व पत्नीसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारी कुणाल किशोर मुलमुले हा तरुण वास्तव्यास आहे. तो दिनेश यांचा मित्र आहे, कुणाल दिनदयाल थाली नावाच्या हॉटेल मध्ये काम करतो. यादरम्यान हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांसोबत कुणालची ओळख झाली. दरम्यान त्या ग्राहकांनी आपल्याकडे असलेल्या वडीलोपार्जित सोन्याच्या नाण्यांची विक्री करायची असल्याचे कुणाल मुलमुलेला सांगितले. ही बाब कुणालने दिनेश भोंगाडे याला सांगितले. यावर दिनेश याने आधी नाणी चेक करुन त्यानंतर पुढील बोलणी करु असे कुणालला सांगितले. त्यानुसार कुणाल याने संबंधितांना फोनवरुन संपर्क साधला. संबंधितांनी कुणाल यास नांदुरा रेल्वेस्टेशनवर बोलावले. पहिल्यांदाचा भेटीत खरी सोन्याची नाणी दाखविली.. अन् विश्वास संपादन केला.

ठरल्याप्रमाणे ४ ऑक्टोंबर रोजी कुणाल हा नांदुरा रेल्वे स्टेशनवर गेला. याठिकाणी त्याने संबंधितांकडून चेक करण्यासाठी सोन्याची नाणी घेतली, ही नाणी दिनेश व कुणाल याने इतरांकडून तपासली यात नाणी खरोखर सोन्याची असल्याचे निष्पन्न झाल्यावर कुणालने याने समोरील व्यक्तींना फोन करुन १ किलो सोन्याच्या नाणींचा २२ लाख रुपयांमध्ये सौदा केला. यात १० लाख रुपये रोख व उर्वरीत रक्कम ही सोन्याची नाणी विक्री झाल्यावर द्यायचे ठरले. त्यासाठी दिनेश याने त्याच्या वडीलांची ८ लाख रुपयांची एफडी मोडून, एका बँकेतून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले. संबंधित पैसे घेवून दिनेश व कुणाल सोबत मित्राच्या कारने नांदुरा येथे गेले. त्याठिकाणी संबंधितांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे येण्यास सांगितले. मुक्ताईनगरात पोहचल्यावर पुन्हा पुरनाड फाट्याजवळ डोलारखेडा रोड येथे बोलावले. याठिकाणी पोहचल्यावर संबंधितांनी सोन्याची नाणी दिनेश व कुणालकडे दिली. त्या बदल्यात दिनेश याने ९ लाख ५० हजार रुपये संबंधितांना दिले. व त्यांच्याकडन ४०० नाणी घेतली. घरी आले सोनाराला नाणी दाखविली तर ती खोटी निघाली. ९ ऑक्टोंबर रोजी दिनेश व कुणाल हे नागपूरात पोहचल्यावर त्यांनी घरी तसेच सोनाराकडे जावून नाणी तपासली असता, ती खोटी असल्याचे समोर आले. त्यानुसार कुणाल याच्या मदतीने विश्वास संपादन करत त्याच्या तीन साथीदारांनी खोटे नाणी देवून साडे नऊ लाखांत फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर दिनेश भोंगाडे याने शुक्रवारी मुक्ताईनगरात येवून पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनुसार कुणाल मुलमुले याच्यासह त्याचे तीन साथीदार अशा चार जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राहूल बोरकर हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.