या नगरसेवकांना मनपा निवडणुकीचे दरवाजे कायम बंद…!

0

लोकशाही, संपादकीय लेख

 

जळगाव महानगरपालिकेतील (Jalgaon Municipal Corporation) भाजपचे (BJP) चार नगरसेवकांना घरकुल घोटाळा (Gharkul Scam) प्रकरणात शिक्षा झाल्याने त्यांना अपात्र ठरविणारा ऐतिहासिक निर्णय जिल्हा कोर्टाने दिनांक १३ एप्रिल रोजी दिला. अपात्र ठरलेल्या भाजपच्या चार नगरसेवकांत माजी नगराध्यक्ष सदाशिव ढेकळे (Sadashiv Dhekle), भाजपचे महानगरपालिकेतील गटनेते भगत बालानी (Bhagat Balani), लता रणजीत भोईटे (Lata Ranjit Bhoite) आणि कैलास आप्पा सोनवणे (Kailas Appa Sonwane) यांचा समावेश आहे. नगरपालिकेच्या घरकुल भ्रष्टाचार प्रकरणात या चारही नगरसेवकांना कोर्टाने शिक्षा सुनावली होती. एकीकडे काँग्रेसने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अब्रू नुकसानीच्या खटल्यात सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्याने कोर्टाचा निकाल जाहीर होताच तातडीने केंद्रातील भाजप सरकारने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. त्यांचे निवासस्थान तातडीने काढून घेण्याचा निर्णय घेतला. देशभर हे प्रकरण गाजत असतानाच जळगाव महानगरपालिकेतील या चार नगरसेवकांच्या अपात्रता प्रकरणाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधींनी जाहीर भाषणात मोठ्या नावाच्या व्यक्तीवर भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती. प्रकरण शिक्षा होण्याइतपत अथवा त्यांची खासदारकी रद्द करण्यात इतपत गंभीर नसल्याने देशभर रणकंदन माजले आहे. भाजपचे हे अपात्र ठरलेले नगरसेवकांचे प्रकरण त्यापेक्षा कितीतरी गंभीर म्हणता येईल. आतापर्यंत नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य अथवा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांना कोर्टाने अपात्र ते ठरवलेल्या प्रकरणात सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले अथवा जातीचे खोटे प्रमाणपत्र दिले किंवा प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती पुरवली म्हणून सभासदत्व रद्द झाल्याचे प्रकरण आहेत. तथापि नगरसेवकांनी भ्रष्टाचार केला, शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली, म्हणून नगरसेवक अपात्र झाल्याची जळगावच्या नगरसेवकांच्या संदर्भातील अपात्रता प्रकरण ऐतिहासिक म्हणता येईल. त्याच बरोबर महापालिकेतील सदस्यांच्या विरोधात महापालिकेतील एका सदस्याने याचिका दाखल केल्याचे सुद्धा ऐतिहासिक प्रकरण म्हणता येईल. जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग १५ मधून निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी भाजपच्या नगरसेवकांविरुद्ध २०२० मध्ये जळगाव जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने याचिका दाखल करून घेतली परंतु त्यानंतर कोरोनाची पहिली लाट आली आणि हे प्रकरण थंड बस्त्यात पडले. वर्षभरानंतर याचिकेच्या संदर्भात कोर्टात कामकाज सुरू झाले आणि त्यानंतर पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे प्रकरण थंड बसतात पडले. गेल्या सहा महिन्यापासून प्रशांत नाईक याची कोर्टात सुनावणी होऊन पाच पैकी चार नगरसेवकांच्या अपात्रते संदर्भात निकाल दिला. पाचवे भाजपचे नगरसेवक दत्तू कोळी यांना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेस स्थगिती दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

वास्तविक भाजपच्या अपात्र घोषित करण्यात आलेल्या चारही नगरसेवकांनी घरकुल घोटाळा प्रकरणात कोर्टाने शिक्षा सुनावली तेव्हाच आपल्या नगरसेवक पदाचे राजीनामे द्यायला हवे होते. परंतु ‘आपला तो बाळू दुसऱ्याचं ते कार्ट’ या उक्तीप्रमाणे भाजपने या नगरसेवकांचे राजीनामे न घेता त्यांना नगरसेवक पदी कायम ठेवले. आता अपात्र ठरलेले कैलास सोनवणे, भगत बालाणी, लता भोईटे आणि सदाशिव ढेकळे यांना सहा वर्षासाठी नव्हे तर कायमस्वरूपी महानगरपालिका नगरसेवक पदाची निवडणूक लढवता येणार नाही. कारण एखाद्या संस्थेतील भ्रष्टाचार प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे, म्हणजे कोर्टातर्फे सजा झालेली आहे. त्यांना त्या संस्थेत कधीही निवडणूक लढाविता येणार नाही, असा कायदा असल्याने त्यांच्यासाठी जळगाव महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्यासाठी दार कायम बंद झाले आहे. मात्र महानगरपालिका सोडून इतरत्र निवडणूक लढवता येऊ शकते. जळगाव महानगरपालिकेतील भाजपच्या या चारही नगरसेवकांच्या अपात्रता प्रकरणी चांगलीच खळबळ उडाली आहे. जेव्हा घरकुल घोटाळा प्रकरणात कोर्टाने शिक्षा सुनावली तो निकाल येताच महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते असलेले भगत बालाणी यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा देण्याऐवजी त्या पदाला चिकटून बसले. सत्तेचा हव्यास सहजासहजी सुटत नाही. त्यानंतर अपात्रते प्रकरणी निकाल घोषित होण्याआधी ८-१० दिवसा ंपूर्वी गटनेते पदाच्या तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा भगत बालाणी यांनी दिला आणि ‘मी तर राजीनामा दिला आहे. म्हणून मला अपात्रते मधून वगळावे’, अशी मागणी केली. म्हणजे ‘चीत भी मेरी आणि पट भी मेरी’ या उक्ती प्रमाणे वागणारे नगरसेवक भगत बालानी सत्तेसाठी किती आपापलेले आहेत हे त्यावरून सिद्ध होते. परंतु त्यांच्यासाठी आता महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठीचे दार कायमस्वरूपी बंद झाले आहे. नगरसेवक अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे सर्वत्र स्वागत होत आहे. याचीका कर्ते नगरसेवक प्रशांत नाईक यांनी कसलीही तमा व भीती न बाळगता न्यायालयाचा लढा दिला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन…!

Leave A Reply

Your email address will not be published.