नाशिकमध्ये STF ने गुड्डू मुस्लिमला ताब्यात घेतलं का ? जाणून घ्या सत्य…

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी सायंकाळी माफिया आणि बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात असताना अतिक अहमद आणि त्याच्या भावाची फिल्मी स्टाईलमध्ये हत्या करण्यात आली. दोन्ही भावांच्या एकाच वेळी झालेल्या हत्येने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले आहे. अहमद भावांच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांच्या STF (स्पेशल टास्क फोर्स) पथकाने नाशिक मध्ये येत चौकशीसाठी एका संशय त्याला ताब्यात घेतले. हा संशयित गुड्डू मुस्लिम असल्याचं बोललं जात होतं.

कोण आहे गुड्डू मुस्लिम ?
अतिक, त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) आणि मुलगा असद (Assad) यांच्याप्रमाणेच गुड्डू मुस्लिम (Guddu Muslim) हा देखील उमेश पाल खून प्रकरणात आरोपी आहे. गुड्डू मुस्लिम हा उत्तर प्रदेशातील मोस्ट वाँटेड हल्लेखोर आहे. उमेश पाल हत्येमध्ये सहभागी असलेला अतिक अहमदचा मेहुणा अखलाव अहमद (Akhlaw Ahmed) याने गुड्डू मुस्लिमला आश्रय दिला होता. गुड्डू मुस्लिमचा अलाहाबादमध्ये मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. तो क्रूड बॉम्ब बनवायचा आणि त्याला गुड्डू बंबाज म्हणूनही ओळखले जाते. उमेश पाल खून प्रकरणात उमेश पाल यांच्यावर दुचाकीवरून बॉम्ब फेकणारा व्यक्ती होता गुड्डू मुस्लिम. अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याने पूर्वी गुड्डूने उत्तर प्रदेशातून पळ काढला होता कारण तो पोलिसांना आधीच हवा होता. तो बिहारला पळून गेला होता पण त्याला 2001 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर अतिक अहमदने त्याला तुरुंगातून बाहेर काढले आणि आणि त्या दोघांचे संबंध घनिष्ट झाले, असे मानले जाते. उमेश पाल खून प्रकरणात गुड्डूचे नाव पुन्हा समोर आले आणि पोलिसांनी गुड्डू मुस्लिमवर ५ लाखांचे बक्षीसही जाहीर केले.

आता मुद्द्यावर येऊ:
नाशिकहुन ताब्यात घेतलेला संशयित गुड्डू मुस्लिम आहे की त्याचा साथी यावर माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली. मात्र यातून एक वेगळं तथ्य समोर आलं आहे. काल रात्री नाशिकमध्ये अतिक अहमद खून प्रकरणात नेमकं काय घडलं, दिल्लीहून आलेल्या पोलिसांच्या पथकाने कोणाला ताब्यात घेऊन चौकशी केली. दरम्यान प्रकरणात अतिक अहमदचा साथी गुड्डू मुस्लिम हा नाशिकमध्ये असल्याच्या संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे या हत्येचं नाशिक कनेक्शन समोर येऊ पाहत होत. याच प्रकरणी पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांचे STF (स्पेशल टास्क फोर्स) पथक शनिवारी (ता. १५) नाशिक मध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.त्या व्यक्तीचे नाव शिवबाबा दिवाकर.

पोलिसांच्या चौकशीमध्ये नेमकं काय घडलं, जाणून घेऊ या…

शिव दिवाकर नाशिक मधील अंबड एमआयडीसी परिसरात एका हॉटेलमध्ये कामाला आहे. दिवाकर सांगतात त्यांच्या मोबाईलवर एक अज्ञात कॉल आला, कॉल उचलताच समोरील व्यक्तीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व पुन्हा या नंबर वर फोन न करण्याची धमकी देखील दिली. हा फोन झाल्याच्या काही तासात दिल्लीहून पोलिसांचे STF पथक नाशिकमध्ये दाखल झाले व दिवाकर ज्या हॉटेलमध्ये काम करतात तेथे पोहोचले. यावेळी हॉटेल चालकाने स्थानिक पोलिसांना देखील याविषयी माहिती दिली. STF पथकाने दिवाकर यांना चौकशीसाठी अंबड पोलीस स्टेशन येथे आणले.

त्यांना आलेला फोन कुठून कोणाचा होता, त्यांचा या घटनेशी काही संबंध आहे का याविषयी सखोल विचारणा करून तब्बल दोन ते तीन तासांच्या चौकशीनंतर दिवाकर यांना पुन्हा त्यांच्या हॉटेलवर सोडून देण्यात आले. “काल दिल्ली पोलिसांचे STF पथक नाशिकमध्ये येऊन चौकशी करून गेले. ते आर्म ॲक्टच्या चौकशीसाठी नाशिकमध्ये आले होते. जाताना त्यांनी गुड्डू मुस्लिम किंवा अन्य कोणालाही सोबत नेले नाहीये.” अशी माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी मीडियाला दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.