एकीकडे हिजाब बंदी… आणि, गणेशोत्सवाला परवानगी! कर्नाटकात मुस्लीम संघटना आक्रमक…

0

 

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क;

कर्नाटकात पुन्हा शाळा कॉलेज मधील धार्मिक वाद चव्हाट्यावर आला आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये 31 ऑगस्टपासून गणेशोत्सव नेहमीप्रमाणे साजरा केला जाईल, असं बीसी नागेश (BC Nagesh) म्हणाले होते. त्यांच्या विधानानंतर अनेक मुस्लीम संघटना आक्रमक झाल्या. शिक्षण संस्थांमध्ये हिजाब (Hijab) घालण्यावर सरकार बंदी घालतं, पण शालेय शिक्षण मंत्री गणेशोत्सव साजरा करायला सांगतात, ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका मुस्लिम संघटनांनी केली आहे. कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी गणेशोत्सवाबाबत (Karnataka Ganeshotsav) घेतलेल्या निर्णयाबाबत मुस्लिम संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

‘शिक्षण मंत्री सरकारी शाळा आणि कॉलेजमध्ये गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला परवानगी देत आहेत. शिक्षण संस्थांमध्ये अशांतता निर्माण करून राजकीय फायदा करून घ्यायचा हा प्रयत्न आहे. हे निषेधार्ह आहे. शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक प्रथांना परवानगी नसल्याचं हेच मंत्री म्हणाले होते, निर्लज्जपणा,’ असं ट्वीट कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाच्या कर्नाटक राज्याचे अध्यक्ष अथवुल्ला पुंजलकट्टे यांनी केलं आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआयची विद्यार्थी संघटना असलेल्या कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाने बीसी नागेश यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

‘गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेला परवानगी आणि इतर धर्माच्या रिवाजांना विरोध, हे अन्यायकारक आहे. शिक्षण संस्थांमध्ये हिजाब आणि कोणत्याही धार्मिक गोष्टी करू नयेत, असं सरकारने स्पष्ट केलं होतं. मग आता सरकारने गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायला परवानगी का दिली? यामुळे इतर धर्माच्या विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत का?’ असा प्रश्न सईद मुईन यांनी विचारला आहे.

कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने हिजाब बंदीचा सरकारचा निर्णय योग्य असल्याचा निकाल दिला. या निकालाचा दाखला देत संघटनेनं भाजप सरकार एका धर्माला झुकतं माप देऊन दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावत आहे, असा आरोपही संघटनेने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.