अकोले परिवाराने जतन केलाय चक्क ७५ वर्षापासूनचा तिरंगा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; 

(स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा अत्यंत उत्साहात साजरा केला गेला. मात्र जळगाव शहरात असेही काही परिवार आहेत ज्यांनी ’१५ ऑगस्ट १९४७’ या तारखेची प्रत्यक्ष आठवण आपल्या हृदयात साठवून ठेवली आहे. असेच एका राष्ट्रभक्त म्हणजे स्वर्गीय जगन्नाथ रावजी वाणी. स्व. जगन्नाथ वाणी यांनी स्वातंत्र्यदिनी यावल येथे ७५ वर्षापूर्वी ध्वजारोहण केले खरे मात्र तोच राष्ट्रध्वज त्यांच्या परिवाराने तब्बल ७५ वर्ष जपून ठेवला. त्याच राष्ट्रध्वजाची ही अनोखी कहाणी.)

 

१९४७ चा व तत्पूर्वीचा ब्रिटिशकालीन काळ म्हणजे पारतंत्र्याचा काळ, गुलामीचा काळ पण याच काळात १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी एक सूवर्ण पहाट उगवली पारतंत्र्याच्या जखडातून व गुलामगिरीतून भारत देश मुक्त झाला. पारतंत्र्याच्या यातना भोगलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यांवर आनंद ओसांडून वाहत होता. प्रत्येकाचा उर गौरवाने, आनंदाने व अभिमानाने भरुन आला होता.

तत्कालीन तरुणाई मध्ये स्वातंत्र्याचा जोश व उत्साह संचारलेला होता. कारणही तसेच होते. २०० वर्षांपासून परकीयांच्या जोखडात असलेला आमचा देश स्वतंत्र झाला होता. ही मातृभूमी आता सुजलाम्, सुफलाम् होणार होती. पारतंत्र्यातून ही भूमी मुक्त होण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचे रान केले होते त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अखंड हिंदूत्वाचे स्वप्न साकार होणार होते. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ज्यापध्दतीने या देशातील वयोवृध्दांपासून ते तरुणांपर्यंत ज्या उत्साहात व जोशात साजरा केला जात आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक जोशाने १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला गेला असेल हे निश्चितच.

देश स्वतंत्र झाला त्यादिवशी प्रत्येक शासकीय कार्यालयात ध्वजारोहण केले गेले व स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला गेला. असाच शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्याचा सन्मान मिळाला तो मूळचे सावदा ता. रावेर येथील रहीवासी परंतु कर्मभुमी जळगाव असेलेले स्वर्गीय जगन्नाथ रावजी वाणी यांना.
स्वर्गीय जगन्नाथ वाणी हे १९४७ साली यावल येथील तहसिल कार्यालयात मामलेदार म्हणून कार्यरत होते. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. तेव्हा यावल येथील तहसिल कार्यालयावर मामलेदार म्हणून स्वर्गीय जगन्नाथ रावजी वाणी यांना सर्वप्रथम ध्वजारोहण करण्याचा सन्मान मिळाला. तो त्यांच्यासाठी अभिमानाचा व गौरवाचा दिवस होता.

नुतन मराठा महाविद्यालयासमोरील आर्फि कर्णयंत्राचे मालक श्री. रमेश अकोले हे त्यांचे कनिष्ठ चिरंजीव. आजही अकोले परिवाराला त्याबद्दल सार्थ अभिमान व गर्व आहे. कै. जगन्नाथ वाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेला १९४७ सालचा राष्ट्रध्वज तिरंगा आजही त्यांच्या स्नुषा सौ.प्रियंका रमेश अकोले यांनी अनमोल रत्नाप्रमाणे जतन करुन ठेवलेला आहे. या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘घर घर तिरंगा’ मोहिमे अंतर्गत अकोले परिवाराने आपल्या घरावर ७५ वर्षापासून जतन करुन ठेवलेल्या १९४७ सालच्या राष्ट्रध्वज तिरंग्याचे ध्वजारोहण केले आणि त्यांचे मन अभिमान व गर्वाने भरुन आले. कै. जगन्नाथ रावजी वाणी हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून १९६७ साली डेप्युटी कलेक्टर पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे निधन झाले

Leave A Reply

Your email address will not be published.