उस्मानाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेले प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्य मंत्री बच्चू कडू यांनी आता “एकला चलो रे” चा नारा दिला आहे. आगामी निवडणुकीत सोबत घेतले तर सोबत, नाहीतर एकट्याने लढणार, अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली आहे.
आज उस्मानाबाद जिल्ह्यात कोर्टाच्या तारखेसाठी आले असता पत्रकारांशी बोलतेवेळी बच्चू कडू यांनी स्वबळाचा नारा दिला. तसंच, मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे नाराजीही बोलून दाखवली.
‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका प्रहार पक्ष एकटा लढणार आहे. जर शिंदे गट आणि भाजपने त्यांची मर्जी असेल आणि त्यांनी आम्हाला सोबत घेतले तर ठीक आहे. नाहीतर आम्ही स्वतंत्र लढू, असे सांगत बच्चू कडू यांनी स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे.
मी दुसऱ्या विस्तारात असणार आहे. नसलो तरी बच्चू कडू हा बच्चू कडू आहे. कसं आहे दूध आटल्यावर खव्वा होतो. त्यामुळे थोडा वेळ लागेल. ‘मंत्रिमंडळ विस्ताराचं सांगणं त्याबाबत फार कठीण आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार ही काही सोपी बाब नाही. मंत्रिपदासाठी निवड करावी लागते. विस्तार कधी होणार हे सांगणे सध्या कठीण आहे. पण माझा अधिकारी आणि हक्कच आहे. मी दिव्यांग कल्याण खाते मागितले आहे, असही बच्चू कडू यांनी सांगितले.