सुरेश दादांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दीचा अन्वयार्थ

0

लोकशाही संपादकीय लेख

घरकुल घोटाळा प्रकरणात (Gharkul scam case) अटकेत असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन (Former Minister Sureshdada Jain) यांना हायकोर्टाकडून (High Court) नियमित जामीन मिळाल्यानंतर त्यांचे बुधवारी रात्री रेल्वेने जळगावात (Jalgaon) आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर त्यांच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती. कोणाही राजकीय नेत्याला हेवा वाटावा असा या गर्दीचा उच्चांक होता.. अलीकडे राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठी अथवा सभेला होणारी गर्दी ही भाडोत्री असते, हा अनुभव आहे. रोजाने पैसे देऊन गाड्या भरून माणसे आणून गर्दी दाखवावी लागते. परंतु गेल्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनात सुरेश दादांनी माणसे जोडली आहेत. माणसे कमवली आहेत. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्यांची रेल्वे स्टेशनवर जमलेली गर्दी उत्स्फूर्त होती सुरेश दादांवर निष्क्रियपणे प्रेम करणारी गर्दी होती, एवढे मात्र निश्चित.

गेल्या दहा वर्षापासून सुरेशदादा राजकारणापासून दूर आहेत. त्यांच्याकडे कसलीही सत्ता नाही, कसलेही राजकीय पद नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काही आर्थिक लाभ होईल यासाठी ही गर्दी जमलेली होती, असे म्हणता येणार नाही. साडेतीन वर्ष जळगाव बाहेर असलेल्या सुरेश दादा जैन यांच्या स्वागतासाठी जमलेल्या या गर्दीचा अन्वयार्थ काय? या प्रश्नाचे उत्तर शोधले, तर गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहराची जी हेळसांड झालेली आहे, जो विकास खुंटला आहे, नागरी सुविधा मिळवण्यासाठी जळगावकरांची दमछाक होत आहे, ती केवळ दिशा भरकटलेल्या राजकीय नेत्यांमुळे होत आहे, असे सर्वसामान्य जळगावकरांना वाटते.

सुरेश दादा जैन यांच्याकडून जळगावकर नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. म्हणून दादांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दीचा उच्चांक झाला होता. रेल्वेच्या डब्यातून उतरण्यापासून ते रेल्वे स्टेशन वरून बाहेर पडण्यासाठी दादांना फार मोठी कसरत करावी लागली. कारण गर्दीतील प्रत्येक जणांना दादांना भेटून त्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक होता. सुरेश दादांना कसलीही सुरक्षा नसताना या गर्दीचा त्यांना कसलाही त्रास झाला नाही. याचे एकमेव कारण म्हणजे प्रेमापोटी जमलेली ही गर्दी होती. दादांच्या स्वागतासाठी जमलेली ही प्रचंड गर्दी पाहून त्यांच्या राजकीय विरोधकांना निश्चित धडकी भरली असणार. सर्वसामान्यांना दिलासा आणि व्यापारी उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवणारा असा हा नेता. त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीकडे पाहून हे खरे वाटते.

जळगाव शहराचा विकास गेल्या दहा वर्षापासून खुंटला आहे. त्यासाठी आपल्याकडे जळगावकर फार मोठ्या अपेक्षाने पाहत आहेत. असे पत्रकारांनी विचारले तेव्हा सुरेश दादांनी “दहा वर्षापासून नव्हे तर गेल्या 2002 पासून जळगावचा विकास खुंटला आहे..” असे सूचक उत्तर दिले. “त्यामुळे बिघडलेली ही परिस्थिती एकदम सुधारणार नाही. ती काही जादूची कांडी नाही”. असेही आवर्जून सांगितले. ‘सक्रिय राजकारणात प्रवेश करणार काय?’ या प्रश्नाचे उत्तर उत्तर देतांना सुरेश दादा जैन अनिच्छा व्यक्त करतात. तरीसुद्धा सुरेश दादांचे मार्गदर्शन, त्यांचा सल्ला, शहर विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याचा अर्थ सुरेश दादा सक्रिय राजकारणात उतरणार नसले तरी त्यांचे जळगाव शहरातील अस्तित्व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोलाचे ठरणार आहे.

सुरेश दादांनी सुरुवातीला काँग्रेस, त्यानंतर शिवसेना (Shivsena), शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि पुन्हा कै. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या साक्षीने शिवसेना असे पक्ष बदल केले. ‘जनतेच्या हितासाठी शंभर वेळा पक्ष बदलावे लागले तरी मी बदलेल’ असे म्हणणारा हा एकमेव नेता होय. तसेच पक्ष बदलानंतर त्या पक्षातर्फे निवडून येणाराही हा एकमेव नेता होय. त्यामुळे ‘सुरेश दादा जैन हे एक अजब रसायन’ आहे. राजकारणात छक्के पंजे करावे लागतात. वरिष्ठांची मर्जी राखावी लागते, त्यांची जीहुजूरी करावे लागते. हे गुण दादांमध्ये नसल्याने राजकारणात त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले. तरीही सुरेश दादांनी आपला स्वाभिमान सोडला नाही. सुरेश दादा महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्ष असताना तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी दादांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर एसटी महामंडळाच्या राजीनामा फेकून आपला बाणा दाखवून दिला. अन्यथा अलीकडचे राजकारण पाहता मुख्यमंत्र्यांची जी हुजरी करीत त्यांच्या मागे पुढे शेपटी हलवत फिरवणारे नेते ‘पायलीला पंधरा’ पाहायला मिळतात.

विदर्भातील प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू (Mla Bacchu Kadu) यांच्याकडे स्वाभिमानी नेता म्हणून पाहिले जात होते. तथापि त्यांच्यावर सत्ताधारी आमदारांकडून झालेले खेचण्याचे आरोप आणि मंत्री पदासाठी आ. बच्चू कडूंनी पत्करलेली लाचारी, जनतेला आवडलेली नाही. सुरेश दादांवर असा आरोप कुणी करणार नाही. कारण कै. बाळासाहेब ठाकरे यांना दोन शब्द सुनावणारा एकमेव नेता सुरेश दादा होय. तरीसुद्धा कै. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश दादांवर मनापासून प्रेम केले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

सुरेश दादा सक्रिय राजकारणात पुन्हा उतरतील असे वाटत नाही. परंतु त्यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळणारे मार्गदर्शन आणि सल्ला मोलाचा ठरणार आहे. त्यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल ? याबाबत त्यांनी आपली पहिली पसंती जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन (Ashok Bhau Jain Chairman of Jain Industry Group)यांना देऊन आपली भावना व्यक्त केली आहे. तथापि अशोकभाऊ यांची याबाबत प्रत्यक्ष प्रतिक्रिया मिळू शकली नसली, तरी राजकारणाच्या संदर्भात त्यांचे वडील कै. भवरलाल जैन यांचे विचार पाहता अशोक भाऊ राजकारणापासून चार हात दूर राहतील असे आम्हाला व्यक्तिशः वाटते. सुरेश दादा जैन यांच्या आगमनाने जळगाव शहर आणि जिल्ह्याचा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे, एवढे मात्र निश्चित. त्यांच्या स्वागतास जमलेल्या गर्दीचा अन्वयार्थ हाच होय…!

Leave A Reply

Your email address will not be published.