राज्यात आता भारनियमन होणार नाही; ऊर्जामंत्र्यांचे स्पष्टीकरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात उन्हाचा तडाखा कायम असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच राज्यात भारनियमन सुरु झाल्याने नागरिक जास्त त्रस्त झाले आहेत. राज्यात भारनियमन होणार का? या प्रश्नावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले की, राज्यात भारनियमनाच्या नुसत्याच वावड्या उठत असून गेल्या २० ते २५ दिवसांपासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात भारनियमन होत नसल्याचा दावा केला आहे. तसेच यापुढेही राज्‍यात भारनियमन होवू देणार नसल्‍याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भुसावळ येथे दिली, आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान ते बोलत होते.

राज्यात भारनियमण होणार का असा प्रश्न उर्जामंत्र्यांना करण्यात आला होता, त्या प्रश्नाला उत्तर देताना तेे म्हणाले की, ‘राज्यातील विविध ठिकाणी वीज भारनियमनाबाबत अनेक संभ्रम आहेत. राज्यात कुठेच गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून कुठेच भारनियमन नाही. भारनियमनाबाबत राज्यात नुसत्याच वावड्या उठवल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीत कुठेच भारनियमन नाही, तसेेच यापुढे राज्यात कुठेच भारनियमन होणारही नाही, असा विश्वास यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.

तसेच या आधी काल नाशिकमध्ये बोलताना देखील ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्रातील औष्णिक वीज प्रकल्पांसाठी कोळशाच्या उपलब्धतेची स्थिती अद्याप सुधारलेली नाही, परंतु राज्य सरकारने राज्यात लोडशेडिंग होणार नाही याची काळजी घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.