महाआरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रुग्णांचे समाधान व्हावे याकरिता रूग्णांच्या सेवेसाठी लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. अनेक रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे गंभीर स्वरूपाच्या रोगांवर उपचार घेऊ शकत नाही, अशा रुग्णांना फायदा पोचविण्यासाठी हे महाआरोग्य शिबिर आहे.

यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून गावागावात जाऊन रुग्णांच्या आजाराची तपशीलवार माहिती गोळा केली जाणार आहे. हे महाआरोग्य शिबिर केवळ खामगाव मतदारसंघापुरते मर्यादित नसून बुलढाणा जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिरात तपासणी करून आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.

दि.12 मे 2022 रोजी केमिस्ट भवन खामगाव येथे लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनी दि.26 मे 2022 रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबिराबाबत नियोजन बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला जळगाव येथील डॉ. उल्हासराव पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एन.एस. आर्वीकर, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अनिलभाऊ नावंदर, सामान्य रुग्णालय खामगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे, नपचे माजी उपाध्यक्ष संतोष देशमुख, डॉ. जयंत देशमुख, ऑर्गनायझर आशिष भेरुड यांची उपस्थिती होती.

डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयाचे डीन डॉ. नारायण आर्वीकर यांनी आपल्या भाषणातून महाआरोग्य शिबिराकरीता डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर, नर्ससह जवळपास दोनशे जणांची टीम हजर राहणार असल्याची सांगितले. एकाच छताखाली रुग्णांना सर्व सुपर स्पेशालिटी सर्जनच्या देखरेखीखाली निःशुल्क रुग्णालयीन सुविधा देण्यात कोणतीही कमतरता पडु देणार नाही असे त्यांनी सांगितले.

खामगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलेश टापरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, अनेक दुर्धर आजारावर या शिबिरात उपचार केले जाणार आहे. रूग्णांना अँजिओप्लास्टी – अँजिओग्राफी यासाठी बाहेर गावी जावून 3 ते 3.50 लाख पर्यतचा खर्च उचलावा लागतो. मात्र शिबिरात ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. तरी रुग्णांनी या संधीचा फायदा घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी असे त्यांनी सांगितले.

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएनचे मानद सचिव अनिलभाऊ नावंदर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून महाआरोग्य शिबिराचे आयोजनाबाबत माहिती दिली. महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व आजारांची तपासणी होऊन, रुग्णांना मोफत औषधोपचार दिले जातील. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियाची गरज आहे त्यांना खामगाव येथून जळगाव येथे जाणे – येण्याचा व खाण्या पिण्याच्या खर्चासह राहण्याचीही निःशुल्क व्यवस्था केली जाणार आहे. गरजू रुग्णांना या महाआरोग्य शिबीराचा लाभ व्हावा याकरिता या शिबिराबाबत प्रसार, प्रचार करावा व या सामाजिक कार्याला आप-आपल्या परीने सर्वांनी सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये महाआरोग्य शिबीर व विदर्भमीरा संस्कारधन सुश्री अलकाश्रीजी यांच्या सुंदरकांड कार्यक्रमाबाबत नियोजन करुन संबंधीतांवर कार्यक्रमाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मधुसुदन अग्रवाल, अजयसेठ खंडेलवाल, दिनेश अग्रवाल, देवेंद्र मुनोत, लक्ष्मणदास आयलानी, दिनेश राठी, राजेश अग्रवाल, राधेश्यामजी अग्रवाल, प्रमोद नोवाल, प्रमोद पनपालीया, फत्तेलाल चांडक, ठाकुरदास चांडक, अमेयदादा सानंदा, किशोरआप्पा भोसले, बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ. सदानंद धनोकार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशसिंह तोमर, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटेखेडे, पंजाबराव देशमुख, निलेश देशमुख, सनी ससाने, मनोज वानखडे, शांताराम करांगळे, अशोकबाप्पू देशमुख, महावीर थानवी, जसवंतसिंग शीख, चरणजीत सिंग शीख, सोनू शहा, केशव कापले, अनंता धामोडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.