मोठी बातमी; खडसेंच्या तोंडी स्वतंत्र खानदेशाची भाषा…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आज जळगावात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. खानदेशातील प्रकल्प सातत्याने इतरत्र हलवले जात असतील, सरकारकडून सातत्याने खानदेशावर अन्याय होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून खानदेशला वेगळं करण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. प्रकल्प होत नाही, विकास रखडला आहे. सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे इच्छा नसतानाही खानदेश महाराष्ट्रपासून वेगळा करावा असं म्हणावं लागत आहे, असा यू टर्न सुद्धा खडसे यांनी यावेळी घेतला.

एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र पाठोपाठ आता, पशु वैद्यकीय महाविद्यालय शासनाने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे. मात्र, जिल्ह्यातले मंत्री निमूटपणे त्याकडे पाहत आहे, मी एकटाच बोलतो पण सरकारकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे खसडे यांनी सांगितले.

जळगावच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जवळचे आहोत असे सांगणारे महाजन आणि पाटलांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून जळगावच्या विकासाचे प्रकल्प आहेत ते पुन्हा खानदेशात आणावेत, असं आवाहन खडसे यांनी केलं. विकासच जर थांबला असेल, सातत्याने खानदेशावर अन्याय होत असेल तर मग कुणाकडे बघावं.

महाजन आणि पाटलांवर टीका…

राज्य सरकार मधील मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील जेवढ्या मोठ्याने बोलतात, त्याच पद्धतीने मंत्री गिरिश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रकल्प पुन्हा खानदेशात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विकास करण्यासाठी वेग दिला पाहिजे, अशी टीका यावेळी खडसेंनी केली. आपल्या मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात, त्या पध्दतिने जिल्हा, खान्देश तसेच उत्तर महाराष्ट्राचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला.

चार महिन्यात 22 वेळा अवैध धंद्यांबाबत आयजी, यांच्यासह मंत्र्यांकडे तक्रारी केल्या. माझ्या सारखा माणूस तक्रार करतो. मात्र, कोणताही उपयोग झाला नाही. सरकारच याला उघड पाठिंबा देत असून अधिवेशनात प्रश्न मांडून सुद्धा या निगरगठ्ठ सरकारने आतापर्यंत कारवाई केली नसल्याचे खडसे म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज जळगावतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.