लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहे. एकेकाळी मांडीला मांडी लावून बसणारे भाऊ आज एकमेकांवर चिखलफेक करतांना दिसत आहेत. राजकारणात पूर्वी कुणाचा तरी बोट धरुन प्रवेश करावा लागत असे. आता मात्र तसे नाही. साम, दाम, दंड, भेद ही चतुसूत्री जवळ असली की झाले एकदाचे नेते…. गेल्या दोन दिवसांपासून असेच सख्य असलेले दोन भाऊ भांड भांड भांडत आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाक्युद्ध सुरू झाले आणि राजकारण चांगलेच तापले. दोघांच्या भांडणाला कारणही ‘बॅग’ असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
श्वानाने घेतला संशयाचा वास…
सुरुवातीच्या काळात जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र (श्वान) विचारत नव्हते. त्यावेळी भाजपला मी जिल्ह्यात मजबूत केले, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी करुन आंगावर भांडण ओढवून घेतले. खडसे बोलले तर त्यांच्या सूड घेण्याची संधी सोडतील ते गिरीशभाऊ कसले? त्यांनीही आक्रमकपणे खडसेंचा समाचार घेत ‘बॅग’वाला अशीच त्यांची प्रतिमा केली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे काँग्रेसमध्ये काम करत होते. हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन फिरताना मी त्यांना बघितले आहे. त्यांनी खूप दगडे खाल्ले, प्रतिकूल परिस्थितीत काम केले असे काही नाही. सन 1990 मध्ये विधानसभेचे त्यांना तिकीट मिळाले आणि ते निवडून आले या गोष्टीचा मी साक्षीदार आहे असे सांगून गिरीशभाऊंनी ‘बॅग’मधून एकएक शस्त्र काढण्यास सुरुवात केली. सरकारमध्ये आल्यानंतर सर्वात जास्त खाते खडसे यांना मिळाले. कोणता वाईट काळ त्यांनी बघितला आहे. तुम्ही पक्षप्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा निवडून आले हे तुम्ही विसरू नका. खडसेंचा हा स्वार्थीपणा आहे. त्यांनी कोणाला शिकवू नये. टाळूवरचे लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत का? अशी टीका गिरीशभाऊंनी करुन वादाला फोडणी दिली आहे.
एकेकाळी भाजपमध्ये असलेल्या या दोघा भाऊंमध्ये सख्य होते. ज्येष्ठतेमुळे युती सरकारच्या काळात नाथाभाऊंना झुकते माप मिळाले आणि गिरीशभाऊ दुसऱ्या क्रमांकावर समाधानी राहिले. गिरीशभाऊंसाठी देवेंद्र फडणवीस नावाची मदत धावून आणि त्यांनी दोघांनी मिळून नाथाभाऊंना भाजपातून अलगद वेगळे केले. नाथाभाऊंनंतर गिरीशभाऊ हे भाजपाचे केंद्रस्थानी आले. जनतेच्या आशिर्वादाने भाजपाचे पुन्हा सरकार आले आणि जिल्ह्यातील सारेकाही विषय गिरीशभाऊंच्या ‘बॅगे’त जमा झाले आता गिरीशभाऊ सांगितील तेच भाजपाचे व्हिजन आणि मिशन देखील झाले आहे. यानिमित्ताने भाजपात देखील ‘बॅग’ चर्चेत आली आहे.