जळगावातील रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर…!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

गेल्या पंधरा वर्षापासून जळगावकर नागरिक चांगल्या रस्त्यापासून वंचित आहेत शहरातील खराब रस्त्यांमुळे अनेक जण जखमी झाले आहेत. काही जणांना प्राणास मुकावे लागले. परंतु महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे तसेच अमृत पाणीपुरवठा योजना आणि मलनित्सारण योजनेमुळे रस्त्यांची चाळणी झाली होती. आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने राज्य शासनातर्फे शहरातील रस्ते बांधण्यासाठी सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यात मोठ्या प्रमाणातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे तर काही ठिकाणी डांबरी रस्ते बांधले जात आहेत. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने रस्त्यांच्या निविदा मंजूर करून ठेकेदारांकडून कामे करून घेतली जात आहेत. परंतु शहराच्या नव्याने तयार होत असलेले रस्ते योग्य गुणवत्तेचे होत नाहीत, अशी टीका सर्वत्र होत असल्याचे दिसून येतेय. त्याचे एकमेव कारण म्हणजे महानगरपालिका असो अथवा सार्वजनिक बांधकाम खाते असो, दोन्ही संस्थांचे ठेकेदार ठराविकच असल्याने आणि त्यांच्यातील टक्केवारीमुळे रस्त्यांची गुणवत्ता चर्चेचा विषय बनले आहे. शहरात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या डांबरी तसेच सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत ओरड सुरू झाली आहे. सदर रस्ते तयार होत असताना त्यांच्या गुणवत्तेबाबत सचित्र पुरावा देऊन काही जागृत नागरिकांनी महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु त्याकडे संबंधित दोन्ही संस्थांकडून काना डोळा करण्यात आला. जुन्या गावातील तीन ते चार महिन्यांपूर्वी झालेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची वाट लागली आहे. सिमेंट रस्त्यावरील सिमेंटच्या ठिकाणी खडी उघडी पडली आहे. त्यातच रस्ते तयार करताना महापालिका पाणीपुरवठा विभाग आणि ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्याने तयार सिमेंटचे रस्ते जेसीबीने खोदून नळ जोडणी करण्यात आली. सिमेंटचे रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे शहराच्या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत संबंधित यंत्रणे कडून लक्ष देणे आवश्यक आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते काव्यरत्नाली चौकापर्यंत झालेल्या सिमेंटच्या रस्त्याची गुणवत्ता चांगली असल्याची चर्चा असून त्याची तुलना इतर रस्त्यांच्या बरोबर केली जात आहे. काव्यरत्नावली चौकापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची वाहवा केली जात आहे, अथवा तशी करून घेतली जात आहे. तर सदर रस्त्यांसारखे शहरातील इतर रस्ते का झाले नाहीत? जनतेला या प्रश्नाचे उत्तर कोण देईल? शहरातील इतर रस्ते चांगले न होण्यामागे निविदेतील ठेकेदाराची सूट देण्यात आली आहे काय? अशा रस्त्यांची बिले मंजूर का केली जात आहेत? या संदर्भात गंभीरपणे विचार विनिमय होण्याची गरज आहे. तथापि टक्केवारीच्या फेऱ्यात शहरातील रस्त्यांचे गुणवत्तेची वाट लागली आहे. त्यामुळे  पुन्हा खराब रस्ते जळगावकरांच्या नशिबी येत आहेत.

सध्या जळगाव महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे प्रभागातील लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप होऊ शकत नाही, अथवा हस्तक्षेप कमी होतोय, हे लक्षात घेऊन चांगले गुणवत्तापूर्वक रस्ते तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासक आणि त्यांच्या टीमची आहे. त्यामुळे गुणवत्ते कडे लक्ष देणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे. म्हणून आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौकापर्यंत च्या रस्त्याची तशी गुणवत्ता आहे तशी इतर रस्त्यांची का नाही?  या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? हा खरा प्रश्न आहे. जळगाव शहरात महत्प्रयत्नाने रस्त्यांची कामे होत आहेत. ती गुणवत्ता पूर्ण झाली पाहिजेत. यावर महापालिका प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी शहराचे आमदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर येते. सुदैवाने जळगाव जिल्ह्याला मंत्री लाभले आहेत. तीनही मंत्रांचा मंत्रिमंडळात विशेष वाचक आहे. त्यामुळे या तिन्ही मंत्र्यांनी जर ठरवले तर शहरातील रस्ते चांगले काय कायम टिकणाऱ्या गुणवत्तेचे होतील. फक्त महापालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यावर तिरपी नजर जरी केली, तर रस्त्यांची कामे चांगल्या प्रकारे होऊ शकतात. फक्त मंत्री महोदयांनी थोडे लक्ष देण्याची गरज आहे. आता जर शहरातील रस्ते चांगले झाले नाहीत आणि आगामी काळात खराब झाले तर येत्या महापालिका निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी पक्षावर जळगावकर लक्ष केंद्रित करतील आणि निवडणुकीत त्याचा हिसका दाखवतील एवढे मात्र निश्चित. परंतु सध्या विकास कामांऐवजी राजकारणावरच सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व्यस्त असल्याचे दिसून येते…!

Leave A Reply

Your email address will not be published.