प्रशासक विद्या गायकवाडांवर कामाची मोठी जबाबदारी

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी जळगाव मनपा लोकनियुक्त प्रतिनिधींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला. 18 सप्टेंबर पासून मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे नगर विकास खात्याचे आदेश प्राप्त झाले. कालपासून डॉ. विद्या गायकवाड यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेऊन कामाला सुरुवात केली. मनपा निवडणूक अजून एक वर्ष होणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतरच सर्व मनपा निवडणूक होतील असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या कालावधीत प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्या कार्याची कसोटी लागणार आहे. लोकनियुक्त प्रतिनिधींच्या कार्यकाळात आयुक्त म्हणून डॉ. विद्या गायकवाड यांनी वर्षभर कार्य सांभाळले आहे. अनेक कटू गोड अनुभव त्यांना अनुभवायला मिळाले. आयुक्त म्हणून थोडीशी ताठर भूमिका घेतली तर जनतेतून निवडून आलेले नगरसेवक नाराज होत असत आणि थोडीशी कामात ढिलाई केली तर नगरसेवक प्रशासनावर हावी होत असता. अशा दुहेरी अवस्थेत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची प्रकल्प राबविण्यात कुचंबना व्हायची. गेल्या वर्षभराच्या काळात जळगाव मनपात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. मुदती आधीच त्यांच्यावर बदलीचा प्रसंग ओढावला. तथापि कोर्टातून त्या सहीसलामत पुन्हा जळगाव मनपाच्या आयुक्तपदी नियुक्त होऊन आल्या. त्यात त्या जिंकल्या. आयुक्त पदाची नव्याने सूत्रे घेतल्यानंतर थोडी ताठर भूमिका घेऊन लोकनियुक्त नगरसेवकांवर कायद्याचा बगडा उगारून नियमाने विकास मंजूर केली. सत्ताधारी भाजप नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा त्यांच्यावर रोष ओढावला. सर्व नगरसेवक एकाच वेळी ‘आयुक्त विद्या गायकवाड हटाव’ आंदोलन सुरू झाले. त्यासाठी भाजपचे नगरसेवक माजी महापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी स्वयंघोषित उपोषण आंदोलन सुरू केले. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या नगरसेवकांनी विद्या गायकवाड यांना हटवण्यासाठी महासभा बोलवावी, असा प्रस्ताव महापौरांकडे दिला. त्यासाठी महासभेची तारीखही ठरली. परंतु महासभेत त्या ठरावाचा फज्जा उडाला. डॉ. अश्विन गायकवाड उघडे पडले. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी इथेही बाजी मारली. सत्ताधारी भाजपची फार मोठी गोची झाली. काही ठराविक नगरसेवकांशी आर्थिक लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर करण्यात आला. तथापि हे बूमरँग आरोप करणाऱ्यांवरच उलटले. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना हटविण्यामागे व्यक्तिगत स्वार्थ असल्याचे उघड झाले. त्यामुळे आर्थिक लागेबांधे कुणाचे? हे स्पष्ट झाले. त्यामुळे मनपा आयुक्तांनी त्यांच्या लोकनियुक्त लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात जणू अग्निपरीक्षाच दिली, असे म्हणावे लागेल. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपण्याआधी सर्वच नगरसेवक आपल्या प्रभागातील विकास कामे करून घेण्यात मात्र व्यस्त होती..

 

मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी लोकनियुक्त लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात काम केलेले आहे. त्या कारकिर्दीत नगरसेवकांवर अर्धी जबाबदारी ढकलण्यात येत होती. अथवा नगरसेवकांवर जबाबदारी ढकलून दिली जात होती. आता लोकनियुक्त प्रतिनिधी शिवाय प्रशासक म्हणून डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर संपूर्णपणे स्वतंत्र जबाबदारी राहणार असून त्यांना ती पार पाडावी लागणार आहे. आणि त्यातूनच त्यांच्या कार्याची चुणूक दिसून येणार आहे. आता प्रशासक म्हणून महानगरपालिकेच्या विकास कामांची संपूर्ण जबाबदारी गायकवाड यांच्यावर आहे. नगरसेवकांवर दोष देऊन त्यांना आता नामानिराळे राहता येणार नाही. तरीसुद्धा लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपता संपता महापुरुषांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि जळगाव रत्न पुरस्कार सोहळा करून डॉ. विद्या गायकवाड यांनी बाजी मारली आहे. जळगाव शहरातील रस्ते, अमृत पाणीपुरवठा योजना, मलनित्सरण योजना, साफसफाई, गटारी, घनकचरा प्रकल्प आदी कामे पूर्ण करण्याचे आव्हान आता एकट्या प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्यासमोर आहे. अनेक रस्ते बांधणीचे कार्यादेश निघालेले आहेत. केवळ पावसामुळे ही कामे प्रलंबित आहेत. पावसाळा संपताच त्या रस्त्यांची कामे झपाट्याने दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजेत. रस्त्यांची कामे जर झाली नाही तर डॉ. विद्या गायकवाड यांना जळगावकर जनता माफ करणार नाही. त्याचबरोबर शहरातील रस्ते महानगरपालिका, बांधकाम विभागातर्फे दर्जेदार झाली पाहिजेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हस्तक्षेप टाळायला हवा. कारण महापालिका प्रशासक आणि सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये समन्वय नसल्याने रस्त्यांच्या गुणवत्तेचे तीन तेरा होत आहेत. त्यासाठी प्रशासकांनी नगर विकास खाते अथवा राज्य शासनाला योग्यरीत्या पटवून देऊन महानगरपालिकेतर्फे रस्ते करण्यासंदर्भात आदेश मिळवून आणले पाहिजेत. त्याचबरोबर जळगाव शहराच्या विकासासाठी आणखी ज्यादा निधी शासनाकडून मंजूर करून आणण्यात प्रशासकांनी कसब वापरले पाहिजे. एकंदरीत महापालिकेच्या निवडणुका घोषित होईपर्यंत जळगाव शहर सर्वच बाबतीत चकाचक झाले, तर प्रशासक म्हणून डॉ. विद्या गायकवाड यांना जळगावकर जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रशासक पदाच्या कारकिर्दीत आपल्या गतिमान प्रशासनाने डॉ. विद्या गायकवाड यांनी वेगळा ठसा उमटवण्याची गरज आहे. मनपा मधील विविध विभागातील अधिकाऱ्यांकडून तसेच विभागातील कर्मचाऱ्यांकडून गतिमानपणे कामे करून घेण्याची डॉ. गायकवाड यांच्यावर आता मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी डॉ. विद्या गायकवाड यांनी जिल्ह्याचे कार्यकुशल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शन घेऊन काम केले तर अवघड काहीच नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.