आ. चंद्रकांत पाटलांनी शक्ती प्रदर्शनात मारली बाजी..!

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेले जिल्ह्यातील शिवसेनेचे पाचही बंडखोर आमदारांचे तब्बल 15 दिवसानंतर मतदार संघात आगमन झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह चार शिवसेनेच्या आमदारांचे स्वागत कभी खुशी कभी गम असे म्हणता येईल. तथापि मुक्ताईनगरचे शिवसेनेचे सहयोगी सदस्य अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे मुक्ताईनगर येथे आगमन झाले आणि त्यांचे जंगी स्वागत मात्र लक्षवेधी ठरले. विशेष म्हणजे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्वागता प्रीत्यर्थ काढण्यात आलेली मिरवणूक, ही सर्वसमावेशक अशी होती. आपल्या मतदारसंघाच्या आमदारांची जणू मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे, आणि मंत्री झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात येऊन जसे स्वागत करावे तो जोश आणि उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता. या मिरवणुकीत मुक्ताईनगर बोदवड मतदार संघातील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक तर होतेच त्याचबरोबर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचाही समावेश होता, हे विशेष म्हणावे लागेल.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांचे स्वागत केले. त्यांचे समवेत भाजपचेही काही नेते उपस्थित होते. जिल्ह्यातील इतर चार शिवसेना बंडखोर आमदारांचे मतदार संघात आगमन झाले असताना त्यांचे स्वागत भाजपकडून केले गेले नाही. परंतु मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे भाजपकडून झालेल्या स्वागता मागे अन्वयार्थ काय? या प्रश्नाचे उत्तर सरळ सोपे असून मुक्ताईनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना शहर देणे, हेच याचे उत्तर आहे. एकनाथराव खडसे यांना शह देण्यासाठी कदाचित आमदार चंद्रकांत पाटलांना अपक्षांच्या कोट्यामधून मंत्रीपदी वर्णी लागण्यासाठी सुद्धा भाजपवाले प्रयत्न करत असतील, यात शंका नाही.

शिवसेनेचे बंडखोर आमदार चिमणराव पाटील आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे देखील जुने वाद पुन्हा उफाळले आहेत. या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे, आमदार चंद्रकांत पाटलांची लॉटरी लागू शकते. विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून आमदार चंद्रकांत पाटलांनी लढवली आणि खडसेंच्या कन्येचा पराभव करून ते विजयी झाले. अगदी थोडे थोडक्या मतांनी ते विजयी झाले. या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचा मोलाचा वाटा असल्याचे नाकारता येणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत पाटलांची उमेदवारी पुरस्कृत केली होती. मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीतर्फे चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात युती असल्याने काँग्रेस पक्षाकडून सुद्धा चंद्रकांत पाटलांना पाठिंबा होता. त्यातच चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांना तांत्रिक कारणास्तव अपक्ष उमेदवारी लढवावी लागत असल्याने शिवसेनेच्या सुद्धा उघड नव्हे तर आतून पूर्णपणे पाठिंबा होता. भाजपकडून एकनाथ खडसेंना शह म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही चंद्रकांत पाटलांकडे आपले झुकते माप टाकल्याचे सर्वश्रुत आहे. त्याबाबत एकनाथ खडसे यांनी पुराव्यानिशी भाजप पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून अहवाल सादर केला होता. त्याची भाजपकडून दखल घेतली नाही हा भाग वेगळा.

एकंदरीत अपक्ष बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेचे मतदारसंघात उत्स्फूर्त स्वागत झाले. त्याच्या पाठीमागे भाजप कारणीभूत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेचाही मतदारसंघात उत्स्फूर्त स्वागत होईल, असे वाटले होते. तथापि दोन दिवस झाले तरी गुलाबराव पाटील हे आपल्या मतदारसंघातील तालुक्याचे ठिकाणी असलेल्या धरणगाव शहरात गेलेले नाहीत.

धरणगाव शहरात जरी त्यांचे समर्थक कार्यकर्ते असले, तरी शिवसेनेचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा एक मोठा गट मूळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे असल्याने, त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी गुलाबराव पाटलांना मोठे कष्ट घ्यावे लागतील, यात शंका नाही. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक असलेली माजी शिवसेना जिल्हाप्रमुख आणि विद्यमान सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी मात्र गुलाबराव पाटलांच्या भूमिकेला कडकडून विरोध केलेला आहे. त्यामुळे गुलाबराव पाटलांची मुलुख मैदान तोफ सध्या थंड बस्त्यात आहे. मतदारसंघात त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून स्वागत होत असले तरी ते गुलाबराव यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारे नाही.

शिवसेनेचे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघात आल्यानंतर गुलाबराव पाटलांविषयी जी खदखद व्यक्त केली, आणि शिवसैनिकाशी चिमणराव पाटलांनी केलेला संवाद म्हणजे गुलाबराव पाटलांच्या प्रतिमेला धक्का लागण्यासारखेच म्हणावे लागेल. चिमणराव पाटील आणि शिवसैनिकाचा फोनवरून झालेले संवाद झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेला उधाण आले. पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पाचोर्यात स्वागताचा थोडा बहुत नामजप झाला असला तरी, उत्स्फूर्त असा प्रतिसाद नव्हता. त्यांच्या मतदारसंघातील भडगाव येथे आमदार किशोर पाटलांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत मूळ जुने शिवसैनिक आणि तळागाळातील शिवसैनिक कार्यकर्त्यांची अनुपस्थिती दिसून आली.

पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांचे काल पारोळ्यात आगमन झाले तेव्हा त्यांच्याकडे कार्यकर्त्यांपेक्षा माध्यमांचे प्रतिनिधींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. याचे कारण आमदार चिमणराव पाटलांचा शिवसैनिका बरोबर झालेला संवाद हे होते. चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे यांच्या आगमनासंदर्भात आणि स्वागताबाबत विशेष अशी चर्चा झाली नाही. मुक्ताईनगरचे अपक्ष आमदारांचे जंगी स्वागत मात्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः आमदार चंद्रकांत पाटलांच्या मिरवणुकीत वाटलेली बुंदी लक्षवेधी ठरली.

Leave A Reply

Your email address will not be published.