जळगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

0

सध्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी भोंगे वाजवण्याचा वाद चिघळला आहे. राज्यात, देशात महागाई सारख्या प्रकाराने जनता त्रस्त झाली आहे. असे असतांना मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालीसाचे भोंगे वाजवण्यात येतील, असा इशारा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देऊन राज्यात समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली आहे. ‘आम्ही हिंदुत्ववादी, आमचे हिंदुत्व श्रेष्ठ’ असा कांगावा भाजप करीत असून मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातील स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपली राजकीय पोळी भाजून घेऊन राजकारणी आपले राजकारण करीत आहेत. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला केंद्रात पूर्वी बहुमत असताना महाराष्ट्र सारखे राज्य त्यांच्या हातून गेल्याची खंत आहे.

महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अस्थिर झाल्याचे चित्र निर्माण करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा प्रयत्न असलेला दिसून येतो. त्यासाठी मनसेसारख्या पक्षाला पाठिंबा देऊन परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा आपल्या एका भूमिकेत ठाम नाहीत त्यांनी आधी त्यांनी भाजपलाही शिव्यांची लाखोली वाहिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस हेही त्यांचे नंबर एकचे शत्रू आहेत.

शिवसेनेच्या बाबतीतही त्यांचे तसेच आहे. ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत. पण त्यांना त्यात यश येत नाही. 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या सभा गाजल्या. या सभांना मोठी गर्दी होत होती. त्यांचा ‘लाव रे तो व्हिडिओ. हे चांगलेच गाजले. परंतु सभांना होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मनसेला मते मिळण्या झाले नाही. लोक करमणूक म्हणून त्यांच्या भाषणाला जायचे आणि टाळ्या वाजवायचे. अशा परिस्थितीत कडवी हिंदुत्वाची भूमिका घेऊन ते आता मैदानावर उतरले आहेत. परंतु हिंदुत्वाने महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी रचनात्मक कार्याची गरज आहे ती मनसेकडून होताना दिसत नाही.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये जाती-जातीत धर्मा धर्मात तेढ निर्माण होऊन सहकार्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी सर्व धर्मीयांमध्ये सौदार्ह्याचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून स्वाक्षरी मोहीम हाती घेतली. आणि या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या स्वाक्षरी मोहीम सर्व धर्मियांकडून फक्त स्वाक्षरीच नाही तर आपले मत व्यक्त देखील व्यक्त केले गेले. आपल्या स्वतःची प्रतिक्रिया देऊन त्यानंतर आपली स्वाक्षरी केली हे विशेष. राष्ट्रीय एकतेचे उदाहरण देऊन काम केले.

सक्तीने शांतता राखली हे एका दृष्टीने बरोबर असले तरी त्याने निर्माण होणारी शांतता कायमस्वरूपी नसते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रबोधनाची गरज असते. हे जळगाव पोलिसांनी या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन द्वारे सह्यांची मोहीम घेण्याचे आदेश दिले. आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला हे विशेष होय. जळगाव पोलिसांच्या या स्वाक्षरी मोहिमेवर मोठ्या मंडळींनीही स्वाक्षरी करून प्रतिसाद दिला. जनतेच्या भावना भडकवून कायदा व सुव्यवस्था बिघडवणे सोपे आहे, परंतु धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्याच्या विरोधात कटिबद्ध होत शांतता, संयम, सामंजस्य, एकमेकांसाठी ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना’ असा संदेश देऊन स्वाक्षरी केली जात आहे. ही फार मोठी कामगिरी जळगाव पोलीस या मोहिमेतून करत आहेत.

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा दौरा झाला. या दौऱ्यात स्वतः धनंजय मुंडे यांनी या स्वाक्षरी मोहीमेत भाग घेऊन स्वतःचा संदेश लिहून सही केली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले हे विशेष. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी मात्र फार मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी जनतेमध्ये प्रबोधन होणे आवश्यक आहे. तेच काम जळगावच्या पोलिसांनी जिल्ह्यात उत्तम रित्या केले आहे. त्यासाठी पोलिसांचे विशेषतः पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांचे आणि त्यांच्या पोलीस सहकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.