बुद्धीवरचा अंकुश मनासाठी हिताचा ठरतो

0

करुणाष्टक 28

मनीं कामना कल्पना ते नसावी I कुबुद्धी कुडी वासना नीरसावी II
नको संशयी तोंडी संसारव्यथा I रघुनायका मागणें हेंचि आतां II

ज्याच्या अंत:करणात अतिकाम विषयभोगाची अत्यंत आसक्ती असते त्याच्या मनात रामाला स्थान असत नाही. हिताचा विचार, चांगल्याचा विचार, परमार्थाचा विचार त्याच्या मनात कधी उत्पन्न होत नाही. आवश्यकता निसर्गतः असते. स्वभावतः असते. मुळात असते. पण चैन कृत्रिमच आहे. चैनीची आवश्यकता वाटू लागली की नैसर्गिक इच्छांची मर्यादा संपून ती अतिक्रमण करू लागली आहे असे समजावे. काम हे अतिक्रमणाचे स्वरूप आहे. आजच्या युगात तर ‘अतिक्रमण’ हा परवलीचा शब्द बनला आहे व तो सध्याच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा आहे. विवेक भ्रष्ट झालेला मनुष्य चांगले काय वाईट काय ठरवू शकत नाही. विदेशी वस्तूंचे वेड इतके पहावयास मिळते की पार्करचे पेन, ली चे जर्किन, पार्क्सची पॅट व पिझ्झा हट मधील पिझ्झा ही जीवनप्रणाली झाली आहे. अशा चित्रात ‘रामाचा’ निवास कोठे असणार? मनाचा निम्मा भाग या कामानेत गुंतून पडलेला तर उरलेला भाग कल्पनेच्या साम्राज्यात त्याला तर सीमाच नाही.”

गणपत वाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच काडी I आणि म्हणायचा या जागेवर बांधीन माडी I” अशीच स्थिती. नाना कल्पनांनी मन व्यग्र असते. चांगल्या-वाईट, खऱ्या- खोट्या, पाप-पुण्य, श्रद्धा -अंधश्रद्धा, समजुती – गैरसमजुती यांच्या ओझ्याने मन भरकटलेले राहत. आपल्याला जाणीव नसली तरी जगातील बहुतेक सर्व व्यवहारांत कल्पनेचा भाग मोठा असतो. सर्वसामान्य माणसाची चांगल्या वाईटाची धारणा किंवा त्याची आवडनिवड नीटपणे पाहिली तर हे लक्षात येते. कडू कारलही आवडीने खाणारे लोक आहेत. उलट पथ्याला चालणारी दुधी भोपळ्याची सात्विक भाजी पानातही न पडू देणारे लोक आहेत. ‘आपला तो बाळ्या, लोकांचे ते कारटे’ असे वाटते या पाठीमागे ही बळ असते ते कल्पनेचे ! व्यवहार नीट राहत नाही. विकृत होतात ते या कल्पनेमुळे माणूस सत्यापासून दूरावतो व सुस्थिती ओळखू शकत नाही. कारण कल्पनेने त्याच्या विवेकाला, जाणिवेला आंधळे बनवलेले असते. म्हणून समर्थ म्हणतात,”मनीं कामना कल्पना ते नसावी.”

यावर बुद्धीचा अंकुश असेल व बुद्धीला नेमक हिताच काय, चांगलं काय हे कळल की मग प्रयत्नाने चंचल मन स्थिर करता येते. एकाग्र करता येते. त्यातील काम -क्रोध -लोभ हळूहळू प्रयत्नाने कमी करता येतात. यासाठी बुद्धी सात्विक हवी, ती दृढ हवी, निश्चयात्मक हवी, सुसंस्कारीत हवी, सत् कडे जाणारी हवी. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजही” कुबुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा” अशी विनवणी करतात. कुसंस्कारीत, मलिन, भ्रष्ट, संशयी बुद्धी ही भगवंतप्राप्तीच्या आड येते. म्हणून पुढे समर्थ म्हणतात,”कुबुद्धी कुडी वासना नीरसावी I”

सुबुध्दी झाल्याशिवाय प्रपंचाची आसक्ति कमी होऊन परमार्था विषयी गोडी लागत नाही व वासनांचा जोर ही कमी होत नाही. अगदी शुल्लक वासनांपासून जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकाविणाऱ्या ही वासनाच असतात. म्हणून मनाला वळण लावावे लागते.” मना वासना वासुदीवी वसा दे” मन ‘रामा’ मध्ये रमले की वासना सहजच क्षीण होतात आणि मनाने वासुदेवाच्या ठिकाणी वस्ती केली की इतर मंडळी, षड्रिपूंचा त्रास ही कमी होत जातो आणि हे जर करण्याचा प्रयत्न झाला नाही तर व्यक्तीच्या व समाजाच्या वर्तनाला खोटेपणाची चटक लागली तर सर्व समाजाचा घात होतो. म्हणून ही ‘कुबुद्धी-वासना’ या नाहीशाच करायच्या आहेत.

आणखी एक बाब नकोच असं समर्थ सांगतात ते म्हणजे ‘संशय’. लहान मुलं तर संस्कारक्षम असतात. चांगल्या गोष्टी पटकन ग्रहण करतात. पण मोठी माणसं? ‘वय वाढे कुबुद्धी वाढे’.. संत खरच झाले का ? ज्ञानेश्वरी वाचून काय होणार ? ध्यान केले तर समाज सेवा कोण करणार ? नाना प्रश्न. काही करायचे नाही त्या आधीच कुशंका. संशय घेऊच नये असे नाही. आपण जे ऐकले, वाचले, अनुभवास आले त्यावर विचारी माणसाच्या मनात प्रश्न उत्पन्न होतात व व्हावेतही. तज्ञाकडून ते निरसन करूनही घ्यावेत. ‘दासबोध’ हा सुद्धा गुरु-शिष्यांच्या संवादच आहे. ज्ञानेश्वरीतही कृष्ण-अर्जुन बोलतात. तुकारामांच्या गाथेतही आपुलाच वाद आपणाशी आहे. भागवतात शुक- परिक्षीत संवाद आहे. प्रश्नांची उत्तर आहेत. शंकाचं निरसन आहे.

परमार्थातही गबाळेपणा, भोळा भाव कामाचा नसतो. पण एकदा कळलं की मग मात्र ‘संशय’ सोडून चालत राहावं लागतं. उगाचच नाठाळ पणा करू नये. वितंडवाद करू नये. निस्वार्थी, तपस्वी पुरुषांचे ऐकावयाचे नाही असा दुराग्रही स्वभाव नसावा. “व्यर्थ संशयाची भक्ती I व्यर्थ संशयाची प्रीती I व्यर्थ संशयाची संगती I संशयो वाढवी II” संशयाने आत्म्याचा सुद्धा नाश होतो. त्या ‘आत्मज्ञान” च्या मधुर फळालाही आपण मुकतो. इतका हा छोटा वाटणारा पण मोठा असा दोष आहे. एखादा तरुण ‘सद्ग्रंथाचे’वाचन करतो तेवढ्यात त्याचा सह्रद येतो व म्हणतो ‘या वयात?’ झाले ! आपला निश्चय संपतो व आपण थांबतो.

मग आहेतच संसाराच्या व्यथा, दात येण्यापासून पडेपर्यंत, लग्न करण्यापासून घर बांधेपर्यंत अनंत सायास करावे लागतात. पण हे करत असताना जर आपण ‘रामनाम’ घेऊ, ‘दासबोध’ ग्रंथाचे वाचन करू. कधीकधी सज्जनगडावर जाऊन समर्थांची भेट घेऊ. तर या संसारव्यथेची ही फुले होतील. त्या फुलांचा परिमल आपला व सभोवतालचा परिसर सुगंधित करून सोडतील.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.