सत्ताधारी : विकास हीच गॅरंटी तर विरोधक : कुठे आहे विकास!

लोकशाहीचा ‘लोकोत्सवा’त जिल्हाध्यक्षांची भूमिका : मतदान करण्याचे केले आवाहन

0

 

जळगाव- 

अठराव्या लोकसभेसाठी जळगाव व रावेर मतदारसंघासाठी सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार असून निवडणूक यंत्रणेसह राजकीय पक्षही सज्ज झाले आहेत. सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीला गत दहा वर्षांच्या काळात झालेल्या विकासाच्या कामांवर पुन्हा सत्ता मिळणार असल्याचा विश्वास आहे तर विरोधात असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीला रखडलेल्या विकासामुळे विजयश्री मिळेल असा विश्वास आहे. दै. लोकशाही आयोजित ‘लोकोत्सवा’त विविध पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाची भूमिका विषद केली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज-जळकेकर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे उपस्थित होते. संचालक राजेश यावलकर यांनी जिल्हाध्यक्षांची भूमिका जाणून घेतली.

—————————————————————————————————————————————–

ज्ञानेश्वर महाराज-जळकेकर (जिल्हाध्यक्ष, भाजपा)

गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात पंतप्रधान नद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा चौफेर विकास साधण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांना चालना देण्यात आली असून दळण-वळणाची सुविधा अधिक सुखकर होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांचा विकास गेल्या सत्तर वर्षांपासून रखडला होता तो मोदीजींच्या काळात मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे. जळगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यावर भर देण्यात आला असून तेथे नवे प्रकल्प यावेत यासाठी गत काळा 12 हजार कोटी रुपयांचे करार करण्यात आलेले आहेत. नवउद्योजकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी अल्प काळात कर्जचा पुरवठा करण्यात येत आहे. मोदीजींनी देशवासियांना विकासाची गॅरंटी दिली असून त्या बळावर विजय प्राप्त होर्इल. जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून तोडफोडीचे राजकारण करण्यात येत असून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी पक्षनिष्ठेला नाही तर निसटानिसटीला प्राधान्य देत आहे. भाजपाकडून आशा, विश्वास आणि गॅरंटी दिली जात आहे. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते अफवांवर प्रचार करीत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे रस्ते तयार झाले असून ते नितीन ‘रोडकरी’ आहेत. पाचोरा व मुक्तार्इनगर येथील एमआयडीसीचा प्रश्न आगामी काळात सोडविला जाणार असून अमृत योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रवादी यांचे मोठे सहकार्य लाभत आहे. ‘देश की सुरक्षा के लिये… रावेरमे रक्षा और खान्देश की अस्मिता के लिये जळगावमे स्मिता’ असे धोरण आहे.

———————————————————————————————————————————

ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष (राष्ट्रवादी-शरद पवार)

गेल्या दहा वर्षांपासून मोदी सरकारने जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प उभारला नसल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शेतकऱ्यांपुढील समस्या दिवसेंदिवस वाढत असतांनाही त्यावर उपाययोजन शून्य आहेत. जिल्ह्यातील रस्त्यांचे कामे ही केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे झाली आहेत. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे ती अन्य मंत्र्यांमध्ये दिसत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न असतांनाही ते सोडविण्यासाठी कुठलेही काम हाती घेण्यात आलेले नाही. आधारभूत किमतीवर खरेदी केंद्र बंद केल्याने शेती मालाला हमीभाव मिळत नाही. कर्जमाफीचा प्रश्न गाळला असतांनाही त्यावर भाजप नेते ‘ब्र’ शब्द देखील काढत नाही. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जाचा भरणा केला त्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देणार होते, त्याचे पुढे काहीच झाले नाही. सिंचनाचा प्रश्न रखडले असल्याने शेतीला पाण्याचा पुरवठा होत नाही. बऱ्याच दिवसांपासून बोदवड सिंचन योजना बंद आहे, त्यावर खासदार म्हणून रक्षा खडसे यांनी काहीही केले नाही. जळगाव एमआयडीचा प्रश्न बिकट होत असून तेथील उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत असतांनाही भाजप नेते मात्र त्यावर काहीही करण्याचे नाव घेत नाही. केवळ मोदींच्या गॅरंटीवर ते मतांचा जोगवा मागत आहेत, मात्र जनता सुज्ञ असल्याने ते त्यांना भीक घालणार नाही हे सत्य आहे. भाजपने देशात केवळ तोडफोडीचे राजकारण करुन सत्ता निर्माण केली आहे. जनता ‘अबकी बार मोदी सरकार तडीपार’ करणार आहे. महाविकास आघाडी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू माणून काम करत आहे. श्रीराम पाटील यांच्या रुपाने उद्योजक उमेदवार मिळाला असून यावर्षी नक्की बदल होर्इल.

———————————————————————————————————————————–

उमेश नेमाडे, जिल्हाध्यक्ष (राष्ट्रवादी-अजित पवार)

पंतप्रधान मोदीजींच्या विकासाच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा दिला आहे. आम्ही आमची विचारधार सोडली नसून विकासासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या दहा वर्षात मोदीजींच्या काळात देशाचा चौफेर विकास झालेला दिसून येत आहे. महागार्इ वाढल्याची ओरड विरोधकांकडून होत असली तरी त्यात कुठलेही तथ्य नाही. दरडोर्इ उत्पन्नाच्या स्त्रोताच्या आधारवर बाजारपेठेतील किंमतीत चढ-उतार होत असतो. ती महागार्इ नसून तो आंतराष्ट्रीय बाजारपेठेवरील परिणाम असतो. विरोधकांकडे कुठलेही व्हिजन नसल्याने जुनेच मुद्दे नवे करुन पुढे रेटत असले तरी त्यांना जनता साथ देणार नाही. मोदीजींनी देशातील प्रत्येकाला साथ देत विकास साधला आहे. जिल्ह्यातील विकासाचा चढता आलेख हा भाजपाच्या खासदारांमुळे झालेला आहे. रस्ते, वीज, पाणी, रोजगार या सर्व बाबींवर बारकार्इने काम करुन समाजाच्या शेववटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचविली जात आहे. आगामी काळात भुसावळ येथील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा देखील विकास साधला जात आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून महायुती हातात हात घेवून काम करीत असून ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या ध्येयानेच भारतीय जनता पक्षाला पाठींबा देण्यात आलेला आहेे. नागरिकांनी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी पुढाकार घेवून विकासाच्या रथाला चालना द्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.