सोनिया गांधींना ED चे पुन्हा समन्स

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नॅशनल हेराल्ड’शी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ED ने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना 23 जून रोजी चौकशीसाठी ईडीसोमोर हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदरही सोनिया गांधी यांना समन्स बजावण्यात आला होता. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता.

दरम्यान, या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसचे  माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही समन्स बजावले होते. तपास यंत्रणेने 13 जून रोजी राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. एजन्सीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर सरकारी यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला.

13 जूनला राहुल गांधींच्या चौकशीच्या दिवशीही काँग्रेस पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि संघटना प्रभारी के.सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी AICC सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

बैठकीत 13 जूनच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. दिल्लीसह  देशभरातील ईडी कार्यालयांसमोर सत्याग्रह करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यासह पक्षाने दिल्लीतील ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पक्षाने यापूर्वीच सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदार, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश प्रभारींना 13 जून रोजी सकाळी 9:30 वाजेपर्यंत पक्ष कार्यालयात पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.