महादेव गेमिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूरला ईडीचे समन्स…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अभिनेता रणबीर कपूरला समन्स पाठवले आहे. महादेव गेमिंग अॅप प्रकरणी ईडीने हे समन्स चौकशीसाठी पाठवले आहे. ईडीने त्याला ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. रणबीर कपूर महादेव गेमिंग अॅपला एंडोर्स करत होता. ईडीचा दावा आहे की त्यांना मोबदल्यात मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाली, जी गुन्ह्यातील रक्कम होती.

ED कडून सध्या 5,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दुबईतून ऑनलाइन सट्टेबाजी अॅप चालवणारे सौरभ चंद्राकर आणि त्याचा व्यावसायिक भागीदार रवी उप्पल यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे.

रिपोर्टनुसार, रणबीर कपूर महादेव ऑनलाइन गेमिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नात सहभागी झाला होता. दुबईत झालेल्या या लग्नात सौरभने 200 कोटी रुपये खर्च केले. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी परफॉर्मन्सही दिला. सौरभवर हवालाद्वारे सेलिब्रिटींना पैसे दिल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर ईडी ऑनलाइन गेम्सच्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या निधीचीही चौकशी करणार आहे.

महादेव ऑनलाइन अॅपची कॉल सेंटर्स श्रीलंका, नेपाळ, यूएई येथे आहेत. महादेव अॅपचे संस्थापक युएईमधून 4-5 समान अॅप्स चालवत आहेत. हे सर्व अॅपद्वारे दररोज सुमारे 200 कोटी रुपयांचा नफा कमावत आहेत.

तपास एजन्सीनुसार, महादेव ऑनलाइन बुक अॅप हे एक व्यापक सिंडिकेट आहे जे बेकायदेशीर बेटिंग वेबसाइट्सना नवीन वापरकर्त्यांना नॉमिनेट करण्यासाठी, त्यांचे आयडी तयार करण्यासाठी आणि बेनामी बँक खात्यांमध्ये नावनोंदणी करून निधी काढून टाकण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची व्यवस्था करते.

गेल्या महिन्यात, आर्थिक फसवणुकीची चौकशी करणाऱ्या तपास संस्थेने ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.