गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क;
गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्याच पत्नी आणि मुलीची हत्या केली. हे प्रकरण उमरगाम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे एक व्यक्ती प्रथम पत्नी आणि मुलीसह मंदिरात गेला. यानंतर त्यांना नदी दाखवण्याच्या बहाण्याने नदीवर बांधलेल्या पुलावर नेले. येथे आरोपीने स्वतःच्या पत्नी आणि मुलीला पुलावरून ढकलून दिले. पत्नी व मुलीचा नदीत पडून मृत्यू झाला. दोघांना ढकलल्यानंतर आरोपीने स्वतः नदीत उडी मारली.
दोघांचे मृतदेह बाहेर काढले
गुरुवारी माहिती देताना उमरगाम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणातील आरोपीला स्थानिक लोकांनी वाचवले आहे. त्यांनी सांगितले की, आरोपी विजय पांडे (45) हा हमरान गावाजवळील वरोली नदीवरील पुलाखालील खांबावर दिसला होता, त्यानंतर बुधवारी दुपारी त्याची सुटका करण्यात आली. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान त्याने सांगितले की त्याने आपल्या अपस्मारग्रस्त (मिरगी) पत्नी आणि मानसिक आजारी मुलीला नदीत ढकलले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी गायत्री देवी (40) आणि मुलगी गौरी यांचे मृतदेह स्थानिक पोहणार्यांनी नदीतून बाहेर काढले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
उमरगाम शहरातील रहिवासी असलेल्या आरोपीने सुरुवातीला पोलिसांना सांगितले होते की, तो, त्याची पत्नी आणि मुलगी बुधवारी दुपारी शिव मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. नंतर सर्वजण एका पुलावरून नदी पाहायला गेले. येथेच आरोपीने पत्नी आणि मुलीला नदीत ढकलून दिले. पुलावरून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र तो बचावला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी आरोपी विजय पांडेला अटक केली आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.