धुळ्यात सॅनेटरी पॅड सांगून नेत होते दारू… आरोपींना अटक…

0

 

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

बिअर आणि व्हीस्कीची अवैध वाहतूक सॅनेटरी पॅडच्या बनावट बिल्टीने करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अवधान फाट्यावर आयशर ट्रकला पकडण्यात आले. ट्रकसह दारू असा १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. ही दारू गोवा (Goa) येथून सुरत येथे नेली जात होती. याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांमिळालेल्या माहितीनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवधान फाटा येथे आर्वीकडुन धुळ्याकडे येणार्‍या वाहनांची तपासणी सुरू केली. तेव्हा संशयीत ट्रक धुळ्याकडे जात असल्याचे दिसल्याने अडथळा करुन ट्रकला थांबविण्यात आले. आयशर ट्रकमधून (क्र. युपी ८० एफटी ९३९८) बेकायदेशिररित्या विदेशी दारु ही आर्वी-धुळे मार्गे सुरतकडे नेली जात होती.

ट्रकवरील चालकाने त्याचे नाव अर्जुन रामजीत बिंद (२४) रा.शेखाही पो.अधनपुर ता.शाहगंज जि.जौनपुर, उत्तरप्रदेश व क्लिनरने सोमनाथ नाना कोळी (२६) रा.खामखेडा ता.शिरपुर असे सांगितले. दोघांना ट्रकमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी ट्रकमध्ये सॅनीटरी पॅड असल्याचे सांगून त्याबाबत मालाची बनावट बिल्टी दाखविली. त्यामुळे ट्रकमध्ये बेकायदेशीर दारू साठा असल्याच्या दाट संशयावरून ट्रकसह दोघांना ताब्यात घेत पोलीस अधिक्षक कार्यालयात आणून ट्रकची तपासणी करण्यात आली.

ट्रकच्या पाठीमागील बाजुला सॅनीटरी पॅडच्या गोण्या भरल्याचे व समोरील बाजुस दारू व बिअरचेबॉक्स मिळून आले. ७ लाख ८१ हजार ८०० रुपये किंमतीची देशी/विदेशी विविध कंपन्यांची व्हिक्सीचे एकुण २०५ खोके त्यात एकुण ६ हजार ८०४ दारूच्या बाटल्या, ४० हजार ८०० रुपयांची टुरबो प्रिमियम बीअर स्ट्राँगचे २० बॉक्स त्यात ८४० बाटल्या, १० लाखांचा आयशर ट्रक, १२ हजारांचे सॅनिटरी पॅडच्या पांढर्‍या रंगाच्या १२० गोण्या व १० हजारांचे दोन मोबाईल असा एकुण १८ लाख ४४ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. दोघा आरोपींविरूध्द मोहाडीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी हा माल कोठून आणला व कोठे पाठविणार होते या साखळीमध्ये आणखी कोण आरोपी आहेत का, याबाबत दोघांकडे चौकशी केली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पो.स.ई बाळासाहेब सुर्यवंशी, असई संजय पाटील, पोहेकॉ संतोष हिरे, पोना पंकज खैरमोडे, पोलिस शिपाई महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.