चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
राहुल गांधी हे यात्रा घेऊन निघाले. ते जिथे-जिथे गेले, तिथे-तिथे काँग्रेस फुटली-तुटली. लोक सोडून गेले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा लढा आहे. ही निवडणूक देशात मोदींचे राज्य आणायचे की राहुल गांधींना संधी द्यायची याचा निर्णय करणारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी चंद्रपूरच्या गांधी चौकात जाहीर सभा झाली. यावेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, खासदार तथा वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस, आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार, आमदार अशोक उईके, आमदार संदीप धुर्वे, आमदार महेश बालादी, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार आशिष देशमुख, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, सुदर्शन निमकर यांच्यासह पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, देशाचा नेता कोण असेल, देशाचे नेतृत्व कुणाकडे द्यायचे याचा निर्णय प्रत्येकाला करायचा आहे. मुनगंटीवार यांना दिलेले प्रत्येक मत हे मोदींना दिले असणार आहे. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या सर्वंकष विकासासोबत राज्यातील महत्त्वाचे नेते म्हणून अनेक मुद्द्यांनाही हात घातला आहे. त्यामुळेच महायुतीच्या उमेदवारांचे नामांकन दाखल करण्यास चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुरुवात होत होत असल्याचेही सांगितले.