पारोळा:- एका शेतकरी कुटुंबीयांच्या घरात डल्ला मारून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोकड असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना तालुक्यातील दळवेल येथे उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेत दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीवरून जात असल्याचे चित्रित झाले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,
दि.29 जुलैरोजी दीपक पांडुरंग पाटील रा.दळवेल ता पारोळा हे शेतकरी कुटुंब नेहमीप्रमाणे घरातली सर्व कामे आटोपून शेतात शेती कामासाठी निघून गेले दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोट्याने लक्ष ठेवून घरातील पुढच्या दरवाजाला लावलेले कुलूप चावीच्या सहाय्याने उघडून घरात असलेल्या लोखंडी गोदरेज कपाटाच्या तिजोरीची देखील चावीच्या साह्याने उघडले व त्यात असलेले तीन लाख 75 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन लाख 25 हजार रुपयांची रोकड असा एकूण सहा लाख रुपये किमतीच्या वस्तू घेऊन पसार झाले असल्याची घटना घडली आहे .मात्र याबाबत दुपारी घरी आल्यानंतर हा प्रकार कुटुंबियातील सर्वांच्या लक्षात आला.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे उपनिरीक्षक राजू जाधव आदींसह पथकाने पहाणी केली .यानंतर श्वान पथकही दाखल करण्यात आले तसेच फिंगरप्रिंटचे पथक आले होते. या बाबत गावातील एका दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दोन चोर मोटरसायकल वरून फरार होताना दिसले. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.