विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा ; दोन जणांना अटक

0

जळगाव ;- एका विवाहितेने शनिवार दि. २ मार्च रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील भादली येथे घडली . मात्र ही आत्महत्या नसून तिला सासरच्या मंडळींनीच मारले असल्याचा आरोप व तशी फिर्याद विवाहितेच्या भावाने दिल्याने नशिराबाद पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन जणांना अटक करण्यात आले आहे.

जुलेखा गफ्फार पटेल (२८, रा. भादली, ता. जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. जुलेखा पटेल यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. दोन मुले असल्याने ही महिला सासरीच राहत होती. शनिवार दि. २ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरी ही बाब कळविली. त्यानुसार माहेरील मंडळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहचले. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मृतदेह स्वत: न आणता रिक्षातुन रुग्णालयात पाठवून दिल्याचे माहेरच्या मंडळींचे म्हणणे आहे.

शासकीय रुग्णालयात नातेवाईकानीं एकच आक्रोश केला. जो पर्यंत सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. या प्रकरणी मयत महिलेचे भाऊ हासीम याकूब पटेल यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सासू असरफ मुसा पटेल, जेठ कालू उर्फ गयासोद्दीन पटेल, हारुण पटेल, ईसा पटेल, जेठाणी मदिना पटेल, मीना पटेल यांच्यासह वसीम सलीम पिंजारी (सर्व रा. भादली) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यापैकी जेठ कालू पटेल व इसा पटेल यांना अटक करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत महिलेच्या माहेरची मंडळी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रुग्णालयात पोहचले होते. गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेण्यात आला व माहेरी नेण्यात आला. या वेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. नशिराबाद पोलीस स्टेशनचे पीएसआय महेश घायतड तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.