चालत्या ट्रेनमध्ये तृतीयपंथीच्या वेशात चोरांचा कहर, प्रवाशांना मारहाण करत लुटले…

0

 

नागपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

नागपुरात चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-हटिया एक्स्प्रेस ट्रेनमध्ये काही गुन्हेगारांनी प्रवाशांना मारहाण करून त्यांचे सामान लुटले. लुटमार करणारे सर्व लोक तृतीयपंथीच्या वेशात होते. त्यांची संख्या सुमारे 6 होती. तृतीयपंथी वेशभूषेत असलेल्या लोकांनी सुमारे 40 प्रवाशांना लुटले. प्रवाशांकडून 500-500 रुपये लुटण्यात आले असून अनेक प्रवाशांना मारहाणही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३-४ जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पुणे-हटिया एक्सप्रेस ही गाडी वर्धा रेल्वे स्थानकावरून नागपूरच्या दिशेने निघाली. ट्रेनचा वेग वाढल्याने तृतीयपंथी स्लीपर डब्यातून जनरल बोगीत घुसले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली, प्रत्येक प्रवाशाकडून 500 रुपये मागितले आणि न देणाऱ्यांना मारहाण केली. काही लोकांनी भीतीपोटी त्यांना पैसे दिले. सुमारे 40 प्रवाशांना लुटून त्यांच्याकडील पैसे जमा केल्यानंतर नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकासमोर रेल्वेचा वेग कमी झाल्यावर सर्व जण रेल्वेतून खाली उतरून पळून गेले.

दोन आरोपींना अटक

ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. ट्रेन येण्यापूर्वी आरपीएफ जवान फलाटावर तयार होते. दुपारी दीडच्या सुमारास ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. प्रवासी घाबरलेले दिसत होते. प्रवाशांनी एकत्रितपणे रेल्वे पोलिसांना आपला त्रास कथन केला, त्यानंतर पीडितांच्या सांगण्यावरून पोलिसांनी दोन तृतीयपंथीयांना अटक केली आणि चौघांचा शोध अजूनही सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.