Corona Vaccination: देशात सप्टेंबर-ऑक्टोबरपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते. एआयआयएमएसचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया  यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम महत्त्वाचं पाऊल ठरु शकते. गुलेरिया यांनी सांगितलं की, माझ्या माहितीप्रमाणे जायडल कॅडिलाने ट्रायल केली आहे आणि सध्या ते अपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनची ट्रायलही लहान मुलांवर ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते.

दुसरीकडे फायझरच्या लसीला अमेरिकेच्या नियमांप्रमाणे आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्याही लसीकरण मोहीमेला सुरुवात होऊ शकते.

भारतात प्रौढांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 42 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात जवळपास 6 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्यात आलं आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील सर्व प्रौढ लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य आहे. यासाठी जवळपास दरदिवशी 1 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या दरदिवशी 40 ते 50 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. परंतु, आठवड्याच्या शेवटी ही संख्या आणखी घटते. सरकारचा उद्देश आहे की, 2021 च्या शेवटापर्यंत सर्वच 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, देशात लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आलेली नाही. अनेक देशांमध्ये आपातकालीन मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, भारतात आतापर्यंत लहान मुलांच्या लसीकरणाला मंजुरी दिलेली नाही.

एम्सच्या प्रमुखांनी बोलताना सांगितलं की, आपल्याला लहान मुलांच्या लसीकरणासाठी देशी लसीची गरज आहे. त्यामुळे भारत बायोटेक आणि झायडल कॅडिलाची लस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. फायझरची लसही लहान मुलांच्या लसीकरणासाठी महत्त्वाची ठरू शकते. परंतु, आपल्याकडील लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याकडे स्वदेशी लस असणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांसाठी अनेक लसी आपल्या देशात उपलब्ध होतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.