वाळू तस्करांना प्रशासनाचे अभय; अवैध वाळूचे वाहन पकडले, मात्र प्रकरण रफादफा ?

0

 खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अवैधपणे वाळूची  वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिस कर्मचाऱ्याला कट मारल्यानंतर सदर वाहन पकडण्यात आले. याबाबत महसूल व पोलिस प्रशासनाला कळविल्यानंतरही  काहीच कारवाई झाली नाही. तर प्रकरण रफादफा झाल्याची चर्चा होत  असून वाळू  तस्करांना महसूल व पोलिस प्रशासनाचे अभय असल्याचे बोलले जात आहे.

गुरूवार 22 जुलै 2021 रोजी रात्री 9.30 वाजताचे सुमारास वाळूची  अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या विना नंबर प्लेटच्या व समोरील काचावर जय श्रीकृष्ण लिहलेल्या टाटा 407 वाहनाने स्थानिक कोर्टासमोर एका पोलिस कर्मचाऱ्याला कट मारला. त्यामुळे सदर पोलिस कर्मचाऱ्याने या वाहनाचा पाठलाग करून अखेर या वाहनाला गोपाळनगर भागात पकडले. याठिकाणी पोलिस कर्मचाऱ्याने वाहनचालकाला रॉयल्टीबाबत विचारणा केली असता त्याच्याजवळ रॉयल्टी नव्हती. त्यामुळे चालकाने वाहन मालकाला बोलावून घेतले असता त्यानेही पोलिस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घातली व तुम्हाला गाडीने उडविले असते तर पाहून घेतले असता अशी मुजाेरीची भाषा बोलून गाडी सोडण्यास सांगितले.

यावेळी स्थानिक नागरिकांची सुध्दा गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याने वाहनचालकाला आपल्यामागे गाडी आणण्याचे सांगून किसननगर भागात नेले. दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवरून सदर प्रकाराची माहिती एसडीओ राजेंद्र जाधव यांना सांगितले  असता त्यांनी मंडळ अधिकारी यांना पाठवित असल्याचे सांगितले. तसेच शिवाजीनगर पोलिसांना कळविले असता त्यांनीही घटनास्थळी येत असल्याचे सांगितले. पण बराच वेळ झाला तरी कुणीही आले नाही.

दरम्यान किसननगर भागातही वाहनमालक व पोलिस कर्मचाऱ्यामध्ये बराच वेळ मचमच सुरू होती. पोलिसाने वाहनाची चाबीही काढून घेतली होती. पण चालकाने डुप्लिकेट चावीने वाहन सुरू करून पोबारा केला. मात्र अद्याप या वाहनाविरूध्द कारवाई झाली नसल्याचे समजते. महसूल व पोलिस प्रशासनाचे वाळू  तस्करांशी साटेलोटे असल्याची बाब नवीन नाही. पण येथे रूजू होताच रेती तस्करीची माहिती देणाऱ्यांना महसूल मित्र पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली होती. मात्र उपरोक्त प्रकरणी काहीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.