कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण…

0

 

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

तब्बल ७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज कोर्टात आरोप निश्चितीची सुनावणी पार पडली. यावेळी सदर प्रकरणातील पोलिसांनी नऊ पैकी तीन आरोपींना कोर्टात हजर केलं. पण सर्व आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतरच आरोप निश्चितीची सुनावणी घ्यावी, अशी विनंती संशयित आरोपींच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान केली. त्यामुळे कोर्टाने त्यांच्या मागणीची दखल घेत पाच ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 5 ऑगस्टला होणार आहे. तसेच कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच या प्रकरणी कोर्टात प्रत्यक्ष सुनावणी पार पडली.

या सुनावणीसाठी आज संशयित आरोपी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि जामिनावर असलेला समीर गायकवाड हजर होते. पण सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. इतर सर्व संशयित आरोपींना प्रत्यक्ष हजर केल्यानंतरच आरोप निश्चितीची सुनावणी घ्या, अशी मागणी संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी कोर्टासमोर केली. त्यांच्या मागणीची दखल कोर्टाने घेतली. अटकेत असलेल्या सर्व संशयित आरोपींना 5 ऑगस्टला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर केले जाणार आहे. या सुनावणी दरम्यान वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी आरोपी वीरेंद्र तावडे याने केली. कोर्टाने त्याच्या मागणीचीही दखल घेतली.

कोल्हापूर येथील सागरमळा परिसरात १६ फेब्रुवारी २०१५ ला दोन अज्ञात हल्लेखोरांकडून कॉम्रेड गोविंद पानसरेंवर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी पानसरे यांचा मृत्यू झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.