रॅली सोडली, जखमी मुलाला घेऊन मुख्यमंत्री रुग्णालयात

रुद्रांश नाव ऐकताच शिंदे आजोबा गहिवरले

0

ठाणे, लोकशाही न्युज नेटवर्क 

शहरातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला सुरुवात झाली असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा एक आगळा वेगळा अनुभव ठाणेकरांना पहायला मिळाला. एक लहान मुलगा जखमी झाल्याचे समजताच मुख्यमंत्री स्वतः मुलाला घेऊन रुग्णालयात पोहोचले. जखमी लहान मुलाचे नाव देखील रुद्रांश असल्याने शिंदे काहीसे भावूक झाल्याचे दिसून आले.

शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात पोहोचली, मात्र रॅली सुरू असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी एक आई आपल्या जखमी मुलाचा हात हातात घेऊन रस्त्याने चाललेली दिसली. या आईच्या खांद्यावर एक मूल तर हातात दुसरे मूल होते. हातात असलेल्या मुलाचा हात गंभीररित्या भाजलेला असल्याने ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. अशात मुख्यमंत्र्यांनी तिला पाहिले आणि त्या माऊलीची अडचण जाणून घेत ते रॅली सोडून तिच्या मदतीला धावून गेले. त्यांनी तत्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतले आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टराना त्यांच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले.

रुद्रांश रोनीत चौधरी असे या नऊ वर्षाच्या मुलाचे नाव होते. घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्याने त्याचा हात गंभीररीत्या भाजला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याला रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू झाले. तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे त्यांची संवेदनशील मुख्यमंत्री ही ओळख ठाणेकर नागरिकांसमोर पुन्हा एकदा अधोरेखित झाली. जखमी झालेल्या लहान मुलाचे नाव देखील रुद्रांश असल्याने मुख्यमंत्री शिंदे थोड्या प्रमाणात भावनिक झाल्याचे देखील दिसून आले. आमच्या घरी देखील एक रुद्रांश आहे असे भावनिक आवाजात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.