प्राचार्यांची 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी : चंद्रकांत पाटील

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर दौर्‍यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

राज्यातील महाविद्यालयांतील प्राचार्यांच्या एकूण आठ हजारांपैकी 2072 प्राध्यापक पदाची लवकरच भरती केली जाईल. याबाबतचे आदेश काढले असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली.

ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठास सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त जाहीर केलेले 50 कोटी रुपयांपैकी दहा कोटी मिळाले. उर्वरित 40 कोटी रुपये देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. डिसेंबरच्या पुरवणी मागणीत याचा समावेश करून टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल. शालेय स्पर्धा दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत, या प्रश्‍नावर बोलताना मंत्री पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी आपण चर्चा करू, असे सांगितले. खेळाडूंचा सराव सुरू करून डिसेंबरमध्ये स्पर्धा घेण्याचा प्रयत्न करायला सांगू.

महाराष्ट्रात हे सरकार येण्यापूर्वी केंद्राकडून भाजपचा खासदार नसलेल्या 144 मतदारसंघाची निवड केली आहे. याठिकाणी व्यवस्थित लक्ष दिले तर भाजपचा खासदार निवडून येऊ शकतो, असेही पाटील म्हणाले.

भाजपचे 2024 लक्ष्य हे देशभरात 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणे आहे. 303 जागांवर विजय मिळवित आणखी शंभर जागा जास्त मिळविण्याचा प्रयत्न असणार आहे. यात राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघावर लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी 16 केंद्रीय मंत्र्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. ते मंत्री तीन दिवसाचा मतदारसंघाचा प्रवास करणार आहेत. 16 मतदारसंघातील 12 जागा शिवसेनेच्या असून त्या आता मुख्यमंत्री शिंदे गटाकडे आहेत. याठिकाणी आम्ही जो प्रयोग करीत आहोत, याचा फायदा होईल.

बारामतीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 16 लोकसभा मतदारासंघावर लक्ष दिले जाणार याचे आम्हाला स्वातंत्र्य आहे. तसेच इतरांनाही कोठेही प्रवास करण्याचे पक्ष वाढविण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु अशा प्रकारे राज्याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केले असते तर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती, अशी टीका त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.