गुजरदरीतील शाळा पडक्या अवस्थेत; उघड्यावर भरते शाळा…

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

चाळीसगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणजे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर डोंगराळ भागात असलेले गुजरदरी गाव. या गावात आदिवासी वस्ती जास्त प्रमाणात आहे. दरम्यान गावात दोन प्राथमिक शाळा असून इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शाळा भरते. या शाळेतील मुला मुलींची पटसंख्या ८३ एवढी असून सुद्धा दोन्ही शाळेच्या खोल्या जीर्ण झाल्या असून, शाळेचा बहुतांश भाग पडक्या अवस्थेत आहे. या पावसाळ्यात शाळा केव्हाही पडू जाऊ शकते. म्हणून शाळेतील शिक्षक शाळा पडेल या भीतीने उघड्या जागेवर शाळेतील मुला मुलींना शिकवतात.

तीन जिल्ह्याच्या सीमेवर गुजरदरी गाव असल्याने व गावाची लोकसंख्या अल्प असल्याने कोणत्याही राजकीय पक्ष या गावाकडे लक्ष देत नाही. शिवाय गुजरदरी हे गाव पाटणा ग्रामपंचायतीला जोडले असल्याने पाटणा आणि गुजरदरी या गावाचे जवळपास अंतर हे ८० किलोमीटरच्या आसपास आहे. या पडक्या शाळेविषयी पाटणा गावचे युवा सरपंच नितीन पाटील यांनी सरपंच या नात्याने संबंधित शिक्षण विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा, शिक्षण विभागाने गेल्या तीन वर्षापासून या शाळेकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाय चाळीसगाव तालुक्यात ज्या गावांना शाळेची आवश्यकता नाही अशा गावांना अतिरिक्त शाळा दिल्या. आणि गुजरदरी येथे शाळेची आवश्यकता असून व शाळेची मागणी करून सुद्धा दिली जात नाही, असा सरपंच आणि गुजरदरी गावातील ग्रामस्थांचा आरोप आहे. सध्या महाराष्ट्रात “शासन आपल्या दारी” म्हणणारे गतिमान सरकार गुजरदरी सारख्या दुर्गम भागातील आदिवासी मुला मुलींचा शैक्षणिक भवितव्यासाठी “नवीन शाळा दिली आपल्या दारी” असा उपक्रम राबवतील का? अशी आशा ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.