थांबा ताक पिताय ? जाणून घ्या फायदे तोटे

0

लोकारोग्य विशेष लेख 

संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात ताक प्यायले जाते .आपल्या महाराष्ट्रात तर अगदी घरोघरी ताक हे असतेच. ताकाचे महत्व अगदी पूर्वापार चालत आले आहे परंतु ताक पिण्याच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत आणि या चुकीच्या समजुतींमुळे ताक पिण्याचे योग्य फायदे होत नाही. चला तर मग जाणून घेऊया ताकाविषयी.. ताक कधी कसे प्यावे, कोणत्या पदार्थांसमवेत घ्यावे तसेच ताकाचे फायदे काय आहेत, ताक पिऊन वजन कमी होतं का इत्यादी सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

आयुर्वेदानुसार ताक हे गोड आंबट व तुरट रसाचे असून उष्ण आहे. परंतु त्याचा विपाक हा मधुर आहे तसेच ते पचायला हलके, रुक्ष, अग्नीदीपन करणारे म्हणजे पचनशक्ती वाढवून भुक वाढवणारे  व ग्राही आहे. ताजे ताक हे त्रिदोषघ्न आहे. साक्षात इंद्रदेवालाही दुर्लभ असे हे ताक आहे. अग्नि मांद्य म्हणजेच भूक लागत नसताना अरुची अजीर्ण स्थौल्य, प्रमेह, विषमज्वर, मेदोरोग, अतिसार मुळव्याध ग्रहणी इरिटेबल बोवेल सिंड्रोम सदृश लक्षण, गॅस्ट्रो, कॉलरा, उदरशुल इत्यादी अनेक आजारात ताकाचा औषधी उपयोग करता येतो. ताकाचे योग्य लाभ मिळवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनेच त्याचा उपयोग आहारात करायला हवा.  ‘भोजनान्ते पिबेत तक्रम’ म्हणजेच दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावे असे सांगितले आहे, तेही फक्त एक ते दोन वाटी इतकेच त्यापेक्षा अधिक मात्रेत ताक पिऊ नये. त्यामुळे शरीरात उष्णता वाढणे, ऍसिडिटी होणे, सूज येणे, त्वचेचे आजार इत्यादी अनेक त्रास होऊ शकतात.  तसेच ताक हे फार आंबट नसावे.  फ्रिजमध्ये ठेवलेले ताक पिऊ नये, अति थंड झाल्यामुळे कफदोष व वातदोष बिघडतात.  बाहेरचे रेडिमेड पॅकिंग ताक सुद्धा पिऊ नये कारण त्यात प्रिझर्वेटिव्ह असतात तसेच अति मीठ असते आणि ते फ्रीजमध्ये ठेवलेले असते रेडिमेट ताक प्याल्याने बऱ्याचदा ऍसिडिटी वाढलेली आढळून येते. तसेच डोकेदुखी, सायनस, सर्दी, घशात खवखव ही लक्षणे ही दिसतात. या ताकात मीठ अति प्रमाणात असल्यामुळे हाय ब्लड प्रेशर असलेल्या पेशंटने आणि त्वचारोगात तर हे टाळावेच.

योग्य ताक घरीच कसे बनवावे 

घरी ताक करण्यासाठी रात्री कोमट दुधाला व्यवस्थित विरजण लावावे. दुसऱ्या दिवशी ते दही पूर्ण विरजलेले दही आधी थोडे थोडे घुसळावे त्यासाठी रवीचाच वापर करावा. हँड मिक्सर किंवा ब्लेंडर बिटर वापरू नये कारण रवीमुळे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व विरुद्ध दिशेने ताक घुसळले जाते हा घुसळण्याचा संस्कार दह्यावर होतो. त्यामुळे ताकाचे गुणधर्म हे दह्यापेक्षा वेगळे दिसतात. दह्याच्या आठ ते दहा पट पाणी घालून पातळ ताक करावे त्यात सैंधव, जिरेपूड, खडीसाखर, मिरपूड, आवळा चूर्ण, आलं, सुंठ इत्यादी पैकी जे गरजेचे आहे ते घालून ताक प्यावे.

वजन कमी करण्यासाठी जेवणाआधी बिनासाईच्या दह्याचे ताक प्यावे.  पचन सुधारण्यासाठी जेवणानंतर ताक प्यावे मात्र फक्त ताक पिऊनच राहू नये.  आज काल बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी फक्त ताक पिऊन राहण्याचा सल्ला दिला जातो जो अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे शरीराला अपाय होऊ शकतो. ऍसिडिटी वाढणे, गॅसेस, जुलाब, त्वचेचे आजार, भ्रम, डोकेदुखी, सायनस, कफाचे त्रास, खोकला इत्यादी होऊ शकतात तसेच शरीराला योग्य पोषण न मिळाल्याने शारीरिक थकवाही भरपूर येतो.

ताक पिऊन पंचकर्म करा असाही चुकीचा सल्ला बरेच लोक देताना दिसतात. ताक पिऊन पंचकर्म होत नाही. पंचकर्म ही आयुर्वेदातील शोधन चिकित्सा आहे त्यात वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्त मोक्षण ही पाच कर्म येतात यामुळे शरीराची शुद्धी केली जाते ‌फक्त ताक पिऊन पंचकर्माने होणारी शरीरशुद्धी होत नाही.

वजन कमी करण्यासाठी मूळव्याध ग्रहणी, डायबेटीस या आजारांमध्ये जेवणापूर्वी ताकात जिरेपूड, आले, सैंधव, मीठ टाकून घ्यावे. ज्वारीच्या भाकरी सोबत ताक घ्यावे किंवा ताक लावून केलेली पालेभाजी घ्यावी.  ज्यांना वारंवार सर्दी, घसा दुखी, कफ खोकला इत्यादीचा त्रास होतो त्यांनी ताक पिणे टाळावे.  जास्त शारीरिक श्रम जास्त व्यायाम जागरण करणाऱ्या लोकांनी ताक कमी प्रमाणात घ्यावे. वातप्रकृतीच्या लोकांनी सायीच्या दह्याचे ताक घ्यावे त्यात सैंधव व सुंठ घालावे. पित्त प्रकृतीच्या लोकांनी गोड ताजे ताक खडीसाखर, आवळा चूर्ण घालून प्यावे. कफप्रकृतीच्या लोकांनी ताकात मिरपूड, त्रिकटू चूर्ण, आले घालून प्यावे.  जुने शिळे आंबट ताक फ्रीजमध्ये ठेवलेले ताक पिऊ नये. उन्हाळ्यात थंड वाटले तरी अति प्रमाणात ताक पिऊ नये कारण ताक मुळात उष्ण असते आणि रुक्ष ही असते त्यामुळे शरीरात उष्णता व कोरडेपणा वाढू शकतो. पावसाळा व हिवाळ्यात योग्य पथ्य पाळून ताक प्यावे तसेच वर सांगितलेले सर्व नियम पाळून टाकले तर ताकाचे योग्य ते फायदे नक्कीच  मिळतील.

 

डॉ. लीना बोरुडे (आयुर्वेदाचार्य)

– 9511805298

Leave A Reply

Your email address will not be published.