जामिनावरील आरोपीस पोलिसाकडून बेदम मारहाण…

0

 

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आर्मॲक्टअंतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयितास उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला होता. अटक न होता संशयिताला जामीन मंजूर झाल्याचा राग मनात ठेवून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी निखिल राजपूत या तरुणाला अमानवीय पद्धतीने मारहाण व त्याची अर्धी दाढी कैचीने कापल्याची घटना घडली. याप्रकरणी जखमीवर जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरू असून, जिल्‍हापेठ पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

जिल्‍हापेठ पोलिसांना जखमी निखिल सुरेश राजपूत (२९) रा. दत्तनगर याने दिलेल्या जबाबात नमूद केल्याप्रमाणे निखिलविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी (गुरनं ३३४/२२) अन्वये गुन्हा दाखल असून, त्याने उच्च न्यायालय, औरंगाबाद येथून अटकपूर्व जामीन मिळविला आहे. खंडपीठाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे सोमवार, मंगळवार असे दोन दिवस सलग हजेरी व तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर निखिलला जामीन मंजूर झाला आहे.

न्यायालयाच्या सूचनेनुसार तो सोमवारी (ता. १७) सायंकाळी बाजारपेठ पोलिसांत गेला. गुन्ह्याचे तपासाधिकारी सहाय्यक निरीक्षक हरीश भोये यांची भेट घेत त्यांना माहिती देत असताना अचानक डीबी पोलिस कर्मचारी कापडणे यांनी त्याला निरीक्षक गायकवाड यांनी भेटायला बोलवले असे सांगत निरीक्षक गायकवाड यांच्या केबिनमध्ये नेले. तेथे कुठलेही कारण नसताना, फरारी संशयिताची माहिती विचारून दोन्ही पायांवर पट्ट्याने, नंतर पाठीवर लाकडी काठीने बेदम मारहाण केली. डोक्यावर स्टेपलर फेकत जखमी केले. तसेच कैचीने अर्धवट दाढी कापून पुन्हा मारहाण केली. अगदी मरणासन्न अवस्था झाल्यावर निखिलची सलूनमध्ये दाढी करवून देत त्याच्या मित्राला बोलावून त्याच्यासोबत रात्री उशिरा रवाना करण्यात आले.

प्रकृती अत्यवस्थ झाल्याने कुटुंबीयांनी निखिलला तत्काळ जळगाव येथे हलविले. जिल्‍हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान निखिल राजपूत मारहाण प्रकरणात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जखमी राजपूतचे जबाब नोंदविण्यात आले असून, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कारवाई होणार असल्याचे जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.