आ. चंद्रकांत पाटील करणार रक्षा खडसेंचा प्रचार !

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची शिष्टाई : महायुतीला मिळणार ‘महायश’

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रावेर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयाची हॅटट्रीक साधण्यासाठी पक्षातर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याशी असलेल्या विरोधामुळे रक्षा खडसे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. परंतु, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुक्ताईनगरात जावून आमदार पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली असून आता ते प्रचारात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहभागाने रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीला ‘महायश’ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार श्रीमती रक्षा खडसे विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा देवून सून रक्षा खडसे यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या भाजपतील प्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्या तरी त्याची प्रक्रिया कधी होईल याबाबत अद्याप तारीख निश्चित झालेली नाही.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत केंद्राकडे बोट दाखविले आहे. परंतु, तरीही एकनाथ खडसे यांनी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे पक्षासाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. परंतु याच मतदारसंघातील मुक्ताईनगरचे अपक्ष व शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे महायुतीत आहेत. त्यांनी एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय वाद असल्यामुळे श्रीमती रक्षा खडसे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. आमदार पाटील यांच्या या निर्णयामुळे भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर मतदार संघात फटका बसण्याची शक्यता होती. भाजपला आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवारी मुक्ताईनगरात दाखल झाले, त्यांनी थेट आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे यांच्यात स्थानिक पातळीवर मतभेद आहेत. मनभेद नाहीत; मात्र या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून देशाचा विकास करावयाचा आहे. त्यासाठी मतभेद विसरून प्रचारास सहभागी होण्याचे आपण आमदार चंद्रकांत पाटील यांना आवाहन केले आहे. आमदार पाटील यांनीही त्याला प्रतिसाद दिला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेला साथ देण्यासाठी, आमदार पाटील यांनी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार करून मुक्ताईनगरातून मोठा लीड देण्याबाबत आश्वासीत केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील करणार खडसेंचा प्रचार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वत: मुक्ताईनगरात येवून आमदार चंद्रकांत पाटील यांचे मनातील शंका दूर करून त्यांना प्रचारात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले. रावेर लोकसभा मतदार संघात असलेला मोठा ‘डॅमेज कंट्रोल’ त्यांनी केला असल्याचे दिसून येत आहे. सद्या तरी आमदार चंद्रकांत पाटील यांची भाजप उमेदवार श्रीमती रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी सहमती असल्याचे दिसून येत आहे.  आमदार चंद्रकांत पाटील हे खासदार रक्षा खडसे यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले असून श्री. पाटील कामाला देखील लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.