कर्ज मंजुरीसाठी १० हजारांची घेतली लाच

महिला ACB च्या जाळ्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्हा उद्योग केंद्रातून मोठी बातमी समोर आली आहे. अधिका-यांसोबत ओळख असून म्हशी खरेदीसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणाऱ्या  खासगी महिलेस एसीबी पथकाने अटक  केली आहे. या लाचखोर खासगी महिलेचे नाव  विद्या परेश शहा असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील मौजे पुरी या गावी  तक्रारदाराची शेती आहे.  या शेतजमीनीवर  तक्रारदाराला दुग्ध व्यवसाय सुरु  करायचा होता. या व्यवसायासाठी म्हशी खरेदी करण्यासाठी  तक्रारदाराने काही दिवसांपुर्वी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान  या ठिकाणी विद्या परेश शहा या खासगी महिलेसोबत त्याची ओळख झाली. या महिलेने त्यांना आमिष देत सांगितले की, “मी तुमचे प्रकरण मंजूर करुन आणून देते. माझी येथील अधिका-यांशी ओळख आहे” अशा प्रकारे  तक्रारदाराचा विश्वास संपादन करून तक्रारदारास  तिस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या लाचेच्या पहिल्या हप्त्याची दहा हजार रुपयांची रक्कम स्विकारतांना धुळे एसीबी पथकाने या महिलेस रंगेहाथ पकडून पुढील कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, कविता गांगुर्डे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.