व्यापाऱ्याच्या फसवणुकीने घेतला कापूस विक्री मध्यस्थीचा जीव

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील कापुस विक्रेता मध्यस्थी याने मुख्य कापुस विक्रेता याने फसवणूक केल्याच्या कारणावरून तसेच गावकऱ्यांची माझ्यामुळेच फसवणूक झाली असल्याच्या कारणावरून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना ११ रोजी सायंकाळी घडली असुन या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मात्र संबंधित मुख्य कापुस व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. गुन्हा दाखल झाल्यावरच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भुमीका गावकर्‍यांनी केली होती. पोलिस निरिक्षक यांनी गावकर्‍यांची समजुत काढत घटनेची सखोल चौकशी करून सर्वांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिल्याने गावकर्‍यांनी शांतता पाळली.  माञ पोलीस प्रशासनाने योग्य तपास न केल्यास असंख्य शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानाला बळी पडावे लागेल.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील देविदास कौतिक पाटील (वय  ४८) हे आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होते. परिसरात चांगल्या प्रकारे कापूस उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून देविदास पाटील यांची एका कापुस विक्रेत्याशी ओळख झाली. सुरुवातीला संबंधित व्यापाऱ्याने देविदास पाटील यांचा विश्वास संपादन करण्यासाठी वेळोवेळी संबंधित कापुस उत्पादक शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे रक्कम अदा केली.

मात्र संबंधित व्यापाऱ्याच्या मनात लालसा निर्माण झाल्याने त्याने गेल्या तीन ते चार महिन्यांत लोहटार येथुन देविदास पाटील यांच्या मध्यस्थीने सुमारे ९० ते ९५ लाखांचा कापूस घेतला. मात्र त्या कापसाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना धनादेश दिले. ते धनादेश अनादरीत होवुन शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याकडुन आमची रक्कम काढुन देण्यासाठी देविदास पाटील यांच्याकडे वारंवार मागणी करत होते.

मात्र संबंधित कापुस व्यापारी याचेशी संपर्क होवु शकत नसल्याने आपल्यामुळेच गावकऱ्यांची फसवणूक झाली असल्याच्या कारणावरून अखेर ११ मार्च रोजी देविदास पाटील यांनी आपली जीवनयात्रा संपवली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी ग्रामस्थांनी जो पर्यंत मुख्य कापुस व्यापाऱ्यास अटक होत नाही तो पर्यंत देविदास पाटील यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होते.

१२ मार्च रोजी सकाळी पोलीस निरिक्षक अशोक पवार यांनी लोहटार येथिल ग्रामस्थांना समजवुन लवकरच तपास लावुन न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी देविदास पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेतला. लोहटार येथे १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देवीदास पाटील यांचे पश्चात आई, वडिल, बहीण, पत्नी व दोन मुले असा परीवार आहे.

लोहटार येथील देविदास पाटील यांना आत्महत्यास प्रवृत्त करण्यास कारणीभुत ठरणार्‍यांवर कठोर शासन होईल का? तो व्यापारी शेतकऱ्यांनी जिवाचे रान करुन पिकविलेल्या कापसाचे पैसे देईल का? पोलीस त्या व्यापार्‍याचा शोध लावेल का? अशी अनेक प्रश्न अनुउत्तरीत असुन येणार्‍या काळात पोलीस प्रशासन काय भुमीका घेते याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागुन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.