भाजपा देशात हिंसा, द्वेष आणि भीती पसरवत आहे – राहुल गांधी

0

 

शेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

संत गजानन महाराज की जय म्हणून त्यांनी भाषणाला सुरूवात करत खा. राहुल गांधी यांनी आज, शेगावात भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींनी केंद्रातील भाजपा सरकारला विविध मुद्यांवरून जाब विचारला. भाजपा देशात हिंसा, द्वेष आणि भीती पसरवत असल्याचा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला.

आजची जाहीरसभा बाळापूर रोडवरील पालडीवाल यांच्या शेतात पार पडली. त्यात बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, ७० दिवसाआंधी ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली. दररोज २५ किलोमिटर ही यात्रा प्रवास करीत आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र आणि महाराष्ट्र या राज्यातून आतापर्यंत या यात्रेचा प्रवास झाला आहे.

यात्रेची गरज काय, फायदा काय असा प्रश्न विरोधक उपस्थित करतात. देशाच्या प्रत्येक भागात हिंसा, भीती पसरवण्याचे काम भाजपने केले आहे. तोडण्याचे काम भाजप करीत आहे तर जोडण्याचे काम ही यात्रा करीत आहे असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. भीती, द्वेष, हिंसा यामुळे विभाजन होते तर प्रेमामुळे जग जिंकता येते असेही गांधी म्हणाले.

अनेक तरुणांशी माझे बोलणे झाले, कुणाला वकील, इंजिनियर, डॉक्टर व्हायचे असते. तरुणांच्या आईवडिलांनी घामाने मुलांना शिकवले, मात्र देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे ते म्हणाले. शेतकरी, तरुण, तरुणांचे आईवडील सगळ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. हिंसेने देशाचा फायदा होत नाही मात्र आज संपूर्ण देशभरात भाजप हिंसा पसरवत आहे. महापुरुषांची भूमी आहे, सगळ्या महापुरुषांनी प्रेमाची शिकवण दिली, जोडण्याची शिकवण दिली.

गेल्या ६ महिन्यात महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्या का करीत आहे? याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त असल्याचे ते म्हणाले. विम्याचे पैसे भरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून १ रुपयाही मिळत नाही. शेतकऱ्यांचे १ रुपयांचे कर्ज माफ होत नाही मात्र उद्योगपतींचे कोशी रुपयांचे कर्ज माफहोते, असे का? असा सवालही खा. राहुल गांधी यांनी केला. “डर सुनने से, गले मिलने से मिटता है” असेही राहुल गांधी म्हणाले.

ही यात्रा सुद्धा महापुरुषांच्या वाटेने जात आहे, आम्ही जोडण्याचे काम करीत आहोत असेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी यावेळी मासाहेब जिजाऊंचे स्मरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचे काम जिजाऊंनी केले असे राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मला खूप प्रेम दिले, हे प्रेम मी विसरणार नाही असेही राहुल गांधी भाषणाच्या शेवटी म्हणाले.

यावेळी मंचावर यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, नाना पटोले, तुषार गाधी,राजेश टोपे, राजेंद्र शिगणे, अरुणभाई गुजराती, एकनाथ खडसे, फौजीया खान, अशोक चव्हाण, पुथवीराज चव्हाण, छतीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, प्रणिता शिदे, राजेश ऐकडे, ज्ञानेश्वर पाटील, किरण देशमुख उपस्थित होती. आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेनी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.