घरवापसीचा प्रस्ताव भाजपाकडूनच आला!

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची लोकशाहीशी खास बातचीत : लवकरच होणार पक्ष प्रवेश

0

जळगाव ;-  भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश करण्यासाठी मी कधीही प्रयत्न केले नाहीत, माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा झाल्यात, मी भाजपमध्ये पुन्हा यावे असा प्रस्ताव मला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच दिला आणि मी तो नम्रपणे स्विकारला असल्याची माहिती ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली. दै. लोकशाहीशी ते दिलखुलास संवाद साधत होते. यावेळी लोकशाही माध्यम समूहाचे संचालक राजेश यावलकर, सल्लागार संपादक धों.ज.गुरव, वरिष्ठ उपसंपादक दीपक कुळकर्णी, मुक्तार्इनगर प्रतिनिधी मोहन मेढे उपस्थित होते.

एकनाथराव खडसे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढीसाठी आपण मोठे परिश्रम घेतले. मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव भाजपची साथ सोडावी लागली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीत आपल्याला घेवून विधानपरिषदेवर काम करण्याची संधी देखील उपलब्ध करुन दिली. माझे राष्ट्रवादीत चांगले सुरु होते. सोबत आमदारकीही होती परंतु; भारतीय जना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपण घरवापसी करावी असा प्रस्ताव दिल्याने मी क्षणाचाही विलंब न करता होकार भरला. काही तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश सोहळा लांबला असला तरी तो लवकरच होर्इल असेही श्री. खडसे यांनी सांगितले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आपले चांगले संबंध आहेतच; राजकारणात प्रत्येकाशी संबंध ठेवावे लागतात. वैर करुन राजकारण करता येत नाही, ती महाराष्ट्राची संस्कृती देखील नाही. मंत्री असतांना जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील सिंचनाचा प्रश्न लार्गी लागावा यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. त्यावेळी ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन, अरुणभार्इ गुजराथी यांच्याशी माझे सिंचनासह विकासाच्या प्रश्नांवर एकमत झाल्याने धरणांची निर्मिती करण्यात यश आले. नेता म्हणून नेहमीच पालकत्वाची भूमिका घ्यावी लागते, त्यातूनच विकास साध्य करता येतो. कटुता मनता ठेवून कधीही राजकारण केले नाही आणि भविष्यात देखील करणार नाही.

 

पर्यटन वाढीसाठी प्रयत्न व्हावेत
जिल्ह्यात बरेच पर्यटन स्थळे आहेत, मात्र त्यांच्या विकास झालेला नाही. मुंबर्इ दर्शनासारखा प्रयोग जिल्ह्यात होवू शकतो. पारोळ्यापासून मुक्तार्इनगरपर्यंतच्या पर्यटन स्थळांची चांगली निर्मिती झाली तर पर्यटन वाढ नक्की होर्इल त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आगामी काळात त्यावर काम करणे आवश्यक होवून बसले आहे.

पवारांच्या मनात काय सांगू शकत नाही!
शरद पवार हे उमदे राजकीय व्यक्तीमत्व आहे. आजपर्यंत त्यांनी अनेकदा धक्कातंत्राचा वापर करुन राजकारण केले आहे. त्यांच्या मनात काय सुरु आहे हे कुणीही सांगू शकत नाही. या वयातही त्यांनी पायाला भिंगरी बांधली असून पक्ष वाढीसाठी ते झटत आहेत. राजकारणाचा खडा न्‌ खडा माहिती असणे हा एक उत्तम गुण आहे, तो शरद पवारांच्या ठायी आहे असेही श्री. खडसे म्हणाले.

आमदारकीला धोका नाही
आपण राष्ट्रवादी सोडणार असून लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत, पक्ष बदलाच्या निर्णयामुळे आमदारकीला धोका नाही. खुद्द पवारांनीच आमदारकी राहू द्या असे सांगितल्याने आमदारकीला आता धोका निर्माण होणार नाही. पक्षाने तक्रार केली तरच धोका निर्माण होतो, मात्र तसे होणार नसल्याचेही श्री. खडसे म्हणाले.

‘त्यांना’ निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य
कन्या ॲड. रोहिणी खडसे व स्नुषा रक्षा खडसे यांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. आपण कुणावरही दबाव टाकत नाहीत. ते दोघेही उच्चशिक्षीत असून त्यांना निर्णय घेण्याची क्षमता आहे. कुणी कुठल्या पक्षात रहावे हा त्यांच्या प्रश्न आहे. परंतु निर्णय घेतांना त्याच्या यश-अपयशाची जबाबदारीही घ्यावी लागते.

सर्वांच्या सहकार्यानेच वाटचाल
गेल्या चाळीस वर्षांच्या आपल्या राजकीय वाटचालीत आपण सर्व समाजाला सोबत घेवून कार्य केले आहे. जातीपातीच्या राजकारणाला कधी थारा दिला नाही; मात्र काही ठिकाणी जातीचे समीकरण सोयीच्या राजकारणासाठी जुळविले जाते, ते प्रत्येक जण करीत असतो, मात्र माझ्या राजकीय प्रवासात मला सर्व समाजाने भरभरुन प्रेम दिल्याचेही श्री. खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.