जय भवानी’ शब्द हटवणार नाही – उद्धव ठाकरे

0

मुंबई : – शिवसेना (ठाकरे) पक्षाने लोकसभा प्रचारासाठी जारी केलेल्या प्रेरणा गीतातील ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ या दोन शब्दांबाबत निवडणूक आयोगाने आक्षेप घेत हे शब्द हटविण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आम्ही ‘हिंदू’ धर्माच्या नावाने मते मागितलेली नाहीत, तसेच ‘जय भवानी, जय शिवाजी’ हा महाराष्ट्राचा जयघोष आहे, असा आक्षेप घेणे म्हणजे महाराष्ट्राच्या कुलदैवतेचा अपमान आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही. त्यामुळे हे शब्द आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला फटकारले आहे. शिवसेना ठाकरे गटाने मागील आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एक प्रेरणा गीत प्रसारित केले होते. त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. त्याबाबतची माहिती देण्याकरिता ठाकरे यांनी रविवारी दुपारी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आयोगालाच इशारा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की, डिसेंबर महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी प्रचारावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला मत दिल्यास अयोध्येत राम मंदिराचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतपंतप्रधान नरेंद्र मोदींनी हनुमानाचे नाव घेत ‘जय बजरंगबली का नाम लेकर बटन दबाना’ असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यावेळी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवत याप्रकरणी कारवाई केली होती. अशी तक्रार करण्याचेकारण हे होते की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या मतदानाचा हक्क काढून घेतानाच कोणतेही निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती.

ते कधीही निवडणूक लढविणार नव्हते हा भाग वेगळा, पण आयोगाने त्यांच्यावर ‘नियमानुसार’ कारवाई केल्याचे म्हटले होते. मग आता मोदी-शाह खुले धार्मिक प्रचार करत असताना निवडणूक आयोगाने ‘नियमानुसार’ कारवाई करावी, अशी मागणी केली होती. पण आयोगाने त्याचे कोणतेही उत्तर आजवर दिलेले नाही. त्याचवेळी आयोगाने नियमात काही बदल केले आहेत का?, याची विचारणा आम्ही आयोगाला पुन्हा स्मरणपत्राद्वारे केली, पण त्यांनी काहीही उत्तर दिलेले नाही. जो न्याय मोदी-शाहांना आयोग लावतो तो इतरांना लागू होत नाही काय?, असा सवाल करत ठाकरेंनी निवडणूक आयोगाला कोंडीत पकडले.

Leave A Reply

Your email address will not be published.