शरद पवारांचा जिल्हा दौरा रावेरसाठी फलदायी ठरेल?

0

लोकशाही संपादकीय लेख

लोकसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वच पक्षांना विशेषता सत्ताधारी महायुद्धाची युतीच्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. आता येणाऱ्या टप्प्यातील टक्केवारी वाढविण्याकडे सर्वच पक्षांना लक्ष देण्याची गरज आहे. जळगाव जिल्ह्यातल्या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अधिसूचना जारी झाली असून २५ एप्रिल ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर २९ एप्रिलला माघार घेण्याची अंतिम तारीख असून १३ मे रोजी मतदान होणार आहे. आज पर्यंत भाजप आणि त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केले नाही. परंतु आता निवडणूक प्रचाराचा ज्वर चांगलाच वाढला आहे. रावेर लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे दोन दिवस पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि प्रदेशाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील दौऱ्यामुळे महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उद्योजक श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. विशेषतः भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे बंडाच्या पवित्रात होते. अपक्ष निवडणूक लढविणार तथापि त्याआधी २९ एप्रिल रोजी शरद पवारांची भेट घेऊन हा निर्णय जाहीर करणार असे त्यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले होते. काल शरद पवार आणि संतोष चौधरी यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यातील नाराजी दूर झाली असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात संतोष चौधरी श्रीराम पाटलांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे संतोष चौधरी यांच्या नाराजीवर पडदा पडला असून आता स्वतः संतोष चौधरी श्रीराम पाटलांच्या निवडणूक प्रचारात उतरणार आहेत. एकंदरीत संतोष चौधरींच्या सहकार्यामुळे श्रीराम पाटलांच्या प्रचारात बळ निर्माण झाले आहे. अल्पसंख्यांकांची मते खेचून आणण्यासाठी संतोष चौधरी यांची चांगलीच मदत होईल, असे बोलले जात आहे.

गेल्या दोन दिवसांच्या शरद पवारांच्या जळगाव जिल्ह्यात दौऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेस सह महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे उत्साह निर्माण झाला आहे. भाजपातून राष्ट्रवादीत आलेले आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजपातील घर वापसी संदर्भात शरद पवार यांनी या दौऱ्यात पूर्णपणे दुर्लक्ष केले. एकनाथ खडसेंविषयी टीकाटिप्पणी सुद्धा केली नाही. म्हणजे एकनाथ खडसेंच्या घरवापसीचे प्रकरण भाजपमध्ये थंड बस्त्यात पडले आहे. खडसे भाजपात प्रवेश केव्हा करणार याची चर्चा सुद्धा भाजप कार्यकर्ते करीत नाहीत. याचा अर्थ खडसेंना भाजपवाले सन्मान देत नाहीत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी सोडून भाजपा घर वापसी करणाऱ्या खडसेंना शरद पवार काहीही किंमत देत नाहीत. उलट खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला काय? असा प्रश्न पत्रकारांना विचारला असता “ते मला माहित नाही..” असे उत्तर शरद पवारांनी दिले. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उजव्या बाजूला रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील आणि डाव्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष अॅड रोहिणी खडसे बसलेल्या होत्या. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही भाजपचे उमेदवार पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील, असे मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे. याबाबत शरद पवारांना विचारले असता “अशा प्रकारे मोठमोठ्या गोष्टी करण्याची सवय मला नाही. परंतु रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराला जोरदार टक्कर देतील आणि निवडणूक अटीतटीची होईल..” असे उत्तर देऊन महाजनांच्या वक्तव्याची शरद पवारांनी खिल्ली उडवली. एकीकडे शरद पवारांच्या दौरा लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाच्या उमेदवारांसाठी फलदायी ठरला असं म्हणावं लागेल…!

Leave A Reply

Your email address will not be published.