लोकसभा इच्छुकांचे देव ‘पाण्यात’! ; भाजप यादीबाबत गुप्तता

सर्वांच्या नजरा दिल्लीकडे ; रक्षा खडसेंच्या उमेदवारीला धोका?

0

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार चारसौ’ पार अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने उमेदवारीबाबत गुप्तता कायम ठेवली असून इच्छुकांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. केंद्रीय निवड समितीची गुरुवारी दिल्लीत बैठक पार पडली मात्र यात उमेदवारी यादी जाहीर न केल्याने सर्वांच्या नजरा दिल्लीकडे लागून आहेत. कुठल्या क्षणाला यादी जाहीर होर्इल हे सांगता येत नाही.

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असतानाही राजकीय पक्षांचे उमेदवारीबाबत तळ्यात-मळ्यात सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (उबाठा) ला बहुतांश ठिकाणी उमेदवारांचा शोध घ्यावा लागत आहे. दुसरीकडे भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत असल्याने भाजप श्रेष्ठीही कमालीचे संभ्रमात दिसून येत आहेत. भाजपाच्या निवड समितीची गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली मात्र यात देशातील एकही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. महाराष्ट्रात भाजपाचे निरीक्षक दौऱ्यावर असून ते मतदारसंघनिहाय आढावा घेत असून त्यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. बऱ्याच ठिकाणी निरीक्षकांनी केवळ औपचारिकता पार पाडल्याने पदाधिकाऱ्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. एक-दोन मिनिटांमध्ये उमेदवाराबाबत माहिती घेणे निरीक्षकांना पचणी पडले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रक्षा खडसेंच्या उमेदवारीला धोका?
गुरुवारी दिल्लीत पार पडलेल्या बैठकी तीन टर्म असलेल्या विद्यमान खासदारांना नारळ देण्याचा विचार करण्यात आला आहे. युवा उमेदवारांवर पक्ष भर देणार असून ज्या खासदारांबाबत नाराजी आहे अशांचा पत्ता कट करण्यात येणार आहे. विद्यमान रक्षा खडसे यांची ही तिसरी टर्म असून त्यांच्याबाबत मात्र पक्ष गांभिर्याने विचार करीत नसल्याचे वृत्त आहे. श्रीमती खडसे यांचे सासरे एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने रक्षा खडसे यांना उमेदवारी का द्यावी असा प्रश्न उपस्थित होत असल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

निरीक्षकांचा अहवाल वरिष्ठांना
भाजपाच्या पक्ष निरीक्षकांनी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला असून पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. निरीक्षकांचा अहवाल वरिष्ठांना सोपविला जाणार असून त्यानंतर नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवार दिल्ली दरबारी फिल्डिंग लावण्यात व्यस्त दिसून येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.