मोठी बातमी.. फडणवीस आणि शिंदेंचा शपथविधी आजच होणार ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता राज्यात पुढील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राज्यात भाजपा-शिंदे गट एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले असून ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जात आहेत. दरम्यान फडणवीस आणि शिंदे यांच्या बैठकीनंतर ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यात आज संध्याकाळी उशीरा राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आजच्या शपथविधीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे हे तिघे शपथ घेऊ शकतात. मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला प्रभारी सी.टी रवी उपस्थित होते. याच बैठकीत दिल्लीहून शपथविधी सोहळा पार पाडण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आल्याची माहिती आहे.

राज्यात अस्थिर राजकीय वातावरण असताना लवकरात लवकर सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. अनेक कामे खोळंबली आहेत. त्यात काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत अशा परिस्थिती वेळ न दवडता सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने शपथविधी करून घ्यावा असा संदेश दिल्लीहून आला आहे. शपथविधी सोहळ्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा विचार समोर येत असल्याची माहिती आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.