भुसावळ पालिकेची धडक मोहिम; ११ थकबाकीदारांचे गाळे सिल

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

पालिकेने मार्च अखेरीसच्या पार्श्वभुमीवर थकीत गाळेधारकांवर कारवाई सुरु केली आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईत पालिकेच्या तीन व्यापारी संकूलातील ११ गाळे सिल करण्यात आले. या मोहिमेत ८ लाख ६० हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला. ३१ मार्चपर्यंत व त्यानंतरच्या काळातही शहरातील करवसूली वाढावी, म्हणून थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाईचे सत्र सुरुच राहणार आहे.

पालिकेची यंदाची करवसूली अवघी २६ टक्यांपर्यंत आहे. शहरात पालिकेचे १२६० गाळे आहेत, मात्र गाळेधारकांकडून अल्प रक्कम थकीत असतानाही वेळेत भरणा होत नाही. यामुळे पालिकेने आता थकबाकीची धडक वसूली मोहिम राबवली आहे. शनिवारी पालिकेच्या पथकाने शहरातील महात्मा गांधी मार्केट (डी. एस. हायस्कूल मार्केट), नगरपालिका रुग्णालय मार्केट व छत्रपती शिवाजी महाराज संकूलातील ११ गाळे थकबाकीपोटी सिल केले.

या कारवाईत सिल ठोकण्यापूर्वी काही गाळेधारकांनी थकीत रक्कम भरणा केल्याने ८ लाख ६० हजार रुपये थकबाकी वसूल झाली. पालिकेने आता ३१ मार्चपर्यंत धडक वसूली मोहिम राबवली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकिय अधिकारी परवेज शेख, चेतन पाटील, गोपाळ पाली, अनिल भाकरे, राजेंद्र चौधरी, जय पिंजाणी, अभय विणेवाल आदींनी ही कारवाई केली.

अन्यथा कारवाई सुरुच राहणार

पालिकेची धडक वसूली मोहिम केवळ मार्च एंडींग पर्यंत नाही. यानंतरही थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई सुरुच राहणार आहे. गाळेधारकांनी आपली थकीत रक्कम तत्काळ भरावी, अन्यथा एप्रिल महिन्यातही गाळे सिल केले जातील. पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी व थकीत कर वसूलीसाठी धडक पाऊले उचलणार आहे.

संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी, भुसावळ

Leave A Reply

Your email address will not be published.