मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क
साकळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतची दयनीय अवस्था झाली आहे. दवाखान्याची कौल पडते झाले असून चहुबाजूंनी पाणी पाझरत आहे. कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याचा धोका आहे.
साकळीसह परीसरात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. यामध्ये साकळी पशुवैद्यकिय केंद्रामध्ये शिरसाड, शिरागड, पिळोदा, थोरगव्हाण, मनवेल या गावांचा समावेश होतो. पशुपालनाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे या भागात गाई व म्हशींची संख्या मोठी आहे. श्रेणी दोनचा पशुवैद्यकिय दवाखाना आहे.
या भागात सुसज्ज पशुवैद्यकिय दवाखान्याची आवश्यकता असताना सध्या असलेल्या दवाखान्याची इमारत खोल्या दोन आहे. सदर खोल्या कौलारु आहे. जागोजागी कौल खाली पडले आहे. पावसाळ्यात सर्वत्र पाणी गळते. यामुळे याठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी कर्माचारी यांनाही जनावरांचे लसीकरण, वंधत्व निवारण, औषधोपचार, दूध उत्पादनात वाढ, कृत्रिम रेतन, उत्तम जनावरांची पैदास यांसह शासनाच्या असलेल्या इतर योजनांची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. यासाठी या भागात नविन इमारत उभारण्याची मागणी होत आहे.
आरोग्य सेवा चांगली पण सुविधांचा अभाव
साकळी येथील पशुवैद्यकिय दवाखान्यांमध्ये आरोग्य सेवा चांगली आहे. इमारतीसह पाण्याचे कुंड पाणीविना खाली आहे. कायम डाँक्टर येत नाही यासह विविध सुविधा नसल्याने पशुपालकांची गैरसोय होत आहे. याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. साकळी सह परिसरात मोठ्या प्रमाणावर पशुपालक आहेत. याभागात दुधाचे उत्पादन अधिक घेतले जाते, मात्र सुसज्ज पशुवैद्यकिय केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होते. या भागात नविन सुसज्ज पशुवैद्यकिय दवाखान्याची आवश्यकता आहे. इमारत बांधकाम करण्यात यावे अशी मागणी होत आहे.