शेतकऱ्यांची लाखो रुपयांत फसवणूक; व्यापाऱ्याला पोलिस कोठडी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील भुसार माल खरेदी प्रकरणी व्यापारी योगेश लक्ष्मण सोनजे यास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखा जळगाव यांनी अटक करून भडगाव न्यायालयात हजर केले.  त्यास न्यायालयाने ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे व सहयोगी अधिकारी सुदर्शन दातीर व तक्रारदार पाटील यांनी दिली.

भडगाव येथील भुसार व्यापारी योगेश लक्ष्मण सोनजे अन्य एक यांनी योगेश ट्रेडर्स या फर्मच्या नावे परिसरातील ५० ते ६० शेतकऱ्यांकडून मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, गहू, हरभरा, भुसार माल खरेदी करून मालाचे वजन करून मालाचे पैसे न देता पसार झाला होता. शेतकऱ्यांनी फसवणूक बाबत तक्रार निवेदन दिले होते. यावरून भडगाव पोलिसात महिंदळे येथील शेतकरी अरुण बारकु पाटील यांची तक्रार दाखल झाली.  यात आरोपीने शेतकऱ्यांचे ९४ लाख रुपयांची रक्कम परत दिली नसल्याचे प्राथमिक महिती समोर आली होती. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण विभाग जळगाव यांच्याकडे  वर्ग करण्यात आला  होता.

दरम्यान आरोपीने जळगाव येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज रद्द फेटाळला होता. यात  जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी फिर्यादी कडून भक्कम युक्तीवाद केला होता. यात भडगाव येथिल वकील हेमंत कुळकर्णी यांनी यात मदत केली.

या गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी जळगाव आर्थिक गुन्हा शाखेचे उपविभागीय अधिकारी डेरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातिर, वसीम शेख, भरत जेठावे, दीपक गुंजाळ, परदेशी, अजय चौधरी, निलेश सुर्यवंशी यांच्याकडे काम सोपविण्यात आले होते.

तपासात यापूर्वीच आरोपी यधोधर कोठावदे यास अटक करण्यात आहे. त्यास यापूर्वी भडगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर या शेतकऱ्यांच्या फसवणुकीतील मुख्य सूत्रधार फरार आरोपी योगेश सोनजे यास सुदर्शन दातिर यांच्या टीमने मोठ्या शिताफीने अटक केली. याबाबत दि. २४ रोजी दुपारी आरोपीस आज भडगाव न्यायलायात हजर केले असता. त्यास दि. ३० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने फसवणूक झालेले शेतकरी माजी नगरसेवक राजु देशमुख, सचिन तहसिलदार, कलीम बागवान यांनी पोलीस अधिकारी दातीर व पोलीस कर्मचारी टीमचे आभार मानले.

यावेळी न्यायलायाबाहेर फसवणूक झालेल्या अनेक शेतकऱ्यांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली होती. भडगाव पोलीस कर्मचारी व जळगाव येथील एक पोलीस पथक यावेळी परिसरात तैनात करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.