नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
महत्वाची बातमी तुमच्यासाठी.. एक ऑक्टोबर (1st October)2022 पासून बँकिंगपासून (Banking) इतर नियमांत बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम सगळ्यांवर होणार आहे. पुढील महिन्यापासून डेबिट कार्ड (Debit card) वापराबाबतही नियम बदलणार आहे. तसेच डिमॅट अकाउंटबाबतही (Demat account) महत्त्वाचे नियम लागू होणार आहे.
कार्ड टोकनायझेशन (Tokenization system)
आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी एक ऑक्टोबरपासून कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे. देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे. या पूर्वी हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होता, पण RBI ने ही मुदत सहा महिन्यांसाठी वाढवून 30 जून केली होती. नंतर आरबीआयने 1 ऑक्टोबर 2022 पासून हा नियम लागू करण्याचे निश्चित केले.
कार्ड टोकनायझेशनचा फायदा ?
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा व्यवहार 16-अंकी कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीव्हीव्ही आणि ओटीपी नमूद करावा लागतो. त्यानंतर व्यवहार पूर्ण होतो. जेव्हा कार्ड तपशील एन्क्रिप्टेड पद्धतीने संग्रहित केले जातात तेव्हा फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. टोकनायझेशनमध्ये तुमच्या कार्डची माहिती एका पर्यायी कोडमध्ये रूपांतरित केली जाईल. या कोडच्या मदतीने पेमेंट करणे शक्य होणार आहे.
अटल पेन्शेन योजना (Atal Pension Scheme)
अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची लोकप्रिय योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते. एक ऑक्टोबरपासून या योजनेत बदल होणार आहे. नव्या नियमांनुसार, आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही करदाते असाल तर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची संधी आहे. सध्याच्या नियमानुसार वय 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंतच्या वयाची कोणतीही व्यक्ती या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकते.
डिमॅट अकाउंट (Demat Account)
शेअर मार्केटमधील व्यवहारासाठी डिमॅट अकाउंट आवश्यक असते. अनेकजण शेअर बाजारात व्यवहार करतात. आता डिमॅट अकाउंटधारकांसाठी Two Factor Authentication करणे आवश्यक आहे. तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये Two Factor Authentication चा पर्याय 30 सप्टेंबरपर्यंत Enable करावा लागणार आहे. त्याशिवाय, तुम्हाला तुमचे डिमॅट अकाउंट सुरू करता येणार नाही.
कर्ज महाग होणार ? (RBI Repo Rate)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण आढावा बैठक येत्या आठवड्यात होणार आहे. रिझर्व्ह बँक 30 सप्टेंबर रोजी व्याज दर जाहीर करणार आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्ज महाग होणार आहेत.
एलपीजी गॅस दर वाढ? (LPG Gas Cylinder Price Hike)
एलपीजी गॅस सिलेंडरचे दर एक ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. दर महिन्याला व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर होतात.