उमेदवारी अर्ज घेतला : जोरदार लढत होणार
पुणे ;- आगामी लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन गट आणि पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकामेकांसमोर उभे ठाकल्याने ही निवडणूक प्रतिष्ठा आणि अस्तित्वाची बनली आहे.
या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. तर महायुतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. अशातच आता अजित पवार हे स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झालेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ही कोणती नवी खेळी आहे का? असा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या चार लोकसभा मतदारांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 7 मे रोजी बारामतीसाठी, तर 13 मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार बारामती मतदारसंघासाठी 12 ते 19 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत, तर 20 एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होईल, आणि 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. महायुतीचे तिन्ही उमेदवार 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बारामतीमधून सुनेत्रा पवार, पुण्यातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकत्र अर्ज दाखल करणार आहेत.
डमी उमेदवार म्हणून खबरदारी
उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून रॅली काढून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यामध्ये मोठी जाहीर सभा देखील होणार आहे. सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणारच आहेत. मात्र त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा असल्याने या ठिकाणी कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून अजित पवार हे महायुतीचे डमी उमेदवार असणार आहेत.