असली शिवसेनेला‘असली’वागणूक?भाजपचे तेच तेच !

शिंदेंपुढे वाढता पेच : कुठे कुठे होतेय दमछाक?

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास सर्वच जागांवर भारतीय जनता पक्षाने एका झटक्यात उमेदवार जाहीर केले. उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी भाजपने ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. पण महाशक्तीसोबत जाऊन मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंची मात्र जागा मिळवताना चांगलीच दमछाक होत आहे.

महायुतीचे जागावाटप दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतरही रखडलेले आहे. पाच जागांवर अद्याप तरी महायुतीने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या जागा कोणाला जाणार याचा पेच कायम आहे. विशेष म्हणजे या सगळ्या जागा शिवसेनेने मागील निवडणुकीत जिंकल्या आहेत. ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, कल्याण, नाशिकच्या जागेसाठी असलेला तिढा महायुतीला अद्याप सोडवता आलेला नाही. युतीत सेना लढवत असलेल्या, जिंकत असलेल्या जागांवर भाजपने दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सेनेत अस्वस्थतता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख ‘असली’ शिवसेना म्हणतात. मग असली शिवसेनेला असली वागणूक का, असा प्रश्न शिवसैनिक विचारत आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असलेली जागा शिवसेनेला की भाजपला हा प्रश्न कायम आहे. राजकीय गुरु आनंद दिघेंची कर्मभूमी असलेली ठाण्याची जागा शिंदेंसाठी प्रतिष्ठेची आहे. कल्याणमधून शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पण ठाण्यासह अन्य जागांचा निर्णय होत नसल्यानं कल्याणची जागा लटकली आहे.

2014 पासून नाशिकमध्ये सेनेचा खासदार आहे. पण ही जागाही सेनेला सहज मिळताना दिसत नाही. भाजप, राष्ट्रवादीने त्यांच्या जागा सहज राखल्या. पण शिवसेनेला विद्यमान खासदार असलेल्या जागांसाठी संघर्ष करावा लागत आहे. खासदार हेमंत गोडसे त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत आहे. पण त्यांच्यासह त्यांच्या सुनेला मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत आहेत. अनेकदा मुंबईवारी करुनही त्यांच्या पदरात उमेदवारी पडलेली नाही. भाजप आणि राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा आहे.

भाजपने आग्रह सोडला नाही

पालघरचे सेना खासदार राजेंद्र गावित शिंदेंसोबत आहेत. पण ही जागा शिवसेनेकडेच राहणार की भाजपकडे जाणार ते अद्याप ठरलेले नाही. दक्षिण मुंबईचा आग्रह शिवसेनेने अद्याप सोडलेला नाही. पण भाजपला ही जागा हवी आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा सेनेने भाजपला सोडली. रायगडची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे कोकणात धनुष्यबाण गायब झाल्यात जमा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.