बनावट चलनी नोटा छापणाऱ्या भामट्याला अटक

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

बनावट चलनी नोटा यूट्यूब’वरील व्हिडिओ पाहून छापणाऱ्या तरुणाला जळगाव पोलिसांनी एमआयडीसीतील व्ही सेक्टर मधून छापा टाकून अटक केली आहे. देविदास पुंडलिक आढाव (वय-३०,रा. कुसुंबा ता. जि. जळगाव), असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने त्याच्याकडून १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.

कुसुंबा तालुक्यातील देविदास पुंडलिक आढाव हा भारतीय चलनाच्या नकली नोटा तयार करून ते बाजारात वापर करत असल्याची गोपनीय माहिती विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संशयित आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. सूचनेप्रमाणे रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, सचिन साळुंखे यांनी बुधवारी १ मार्च रोजी त्याला अटक केली.
देविदास आढाव यांच्याकडून १००, २०० आणि ५०० च्या १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नकली नोटा प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी देविदास आढाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.