धक्कादायक : नराधमांनी अपहरण करून महिलेवर केला अत्याचार ! ; पाच जणांना अटक

0

बेशुद्ध होईपर्यंत लचके तोडून सोशल मीडियावर व्हिडीओ केला व्हायरल

गोरखपूर ;- रेल्वे स्टेशनमधून रिक्षाने घरी जाणाऱ्या महिलेचे पाच जणांनी अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून त्या नराधमांनी तेवढ्यावरच न थांबता महिलेला बेशुद्ध होईपर्यंत तिचे लचके तोडून यूट्यूब आणि रिल्ससाठी अश्लील व्हिडीओही चित्रित केले.

मिळालेली माहितीनुसार, पीडित महिला संत कबीरनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. बुधवारी रात्री ती बस्तीहून ट्रेनने गोरखपूरला पोहोचली. पहाटे तीन वाजता ती रेल्वे स्थानकावरून रिक्षाने नौसादला जात होती. त्याचदरम्यान नराधमांनी तिचे अपहरण केले.

राजघाट पुलाजवळ पाच तरुणांनी रिक्षा थांबवून महिलेचे अपहरण केले आणि जबरदस्तीने तिला दुचाकीवर बसवून पेरूच्या बागेत नेले. नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला. त्यानंतर महिला बेशुद्ध झाल्याचे पाहुन तिला त्याच अवस्थेत सोडून तरुणांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला रुग्णालयात दाखल करून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी धाडसत्र राबविले आहे. यावेळी आरोपींनी पोलीस पथकावर गोळीबारही केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मुख्य आरोपी प्रद्युम्न जखमी झाला असून त्याच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी प्रद्युम्नसह अन्य 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी सामूहिक अत्याचाराचा व्हिडीओ बनवला असून पीडितेसोबत अश्लील सेल्फीही घेतल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.